‘कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. डेंग्यूची उत्पत्तीस्थळे का तयार होतात, त्यामागील नेमकी कारणे कोणती आहेत, याची अनेकांना माहिती नसते. कोणत्याही स्वरूपामध्ये अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेल्या पाण्यांमधून आजारांचा फैलाव होणाऱ्या डासांची निर्मिती होते. हे लोकशिक्षण नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देता येते. त्यामुळे हे अॅप मुंबईकरांना उपयोगी पडेल’, असा विश्वास महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी यासंदर्भात माहिती देताना व्यक्त केला.
डेंग्यू विरुद्ध मुंबई हे अॅप अँड्राईड आणि आयओएस फोनवर उपलब्ध झाले आहे. मुंबईकरांना आपापल्या घर आणि परिसरात, तसेच कामाच्या ठिकाणी अंतर्गत उत्पत्तीस्थळांबाबतची माहिती देऊन जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, यासाठी ही माहिती दिली जाणार आहे.
या अॅपमध्ये काय आहे?
-पावसाचे वा इतर कोणत्याही स्वरूपातील पाणी साचू नये, यासाठी कोणत्या वस्तू घर, परिसरांतून काढून टाकाव्यात, याची माहिती.
-पाणी साचू शकतील वा डासांची उत्पत्ती होईल, अशा ठिकाणी वस्तू वा पाणी साठवलेले आहे का याची चाचणी करण्यासाठी अठरा प्रश्न दिलेले आहेत. त्याची उत्तरे द्यायची आहेत. उत्तरे दिल्यानंतर गुणांकन कमी आले तर संबधित व्यक्ती वा सोसायटीला राहत्या जागी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे असल्याचे स्पष्ट होईल. जेणेकरून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी मदत होऊ शकेल.
असाही फायदा…
– पावसाळ्यात भंगार वस्तू, टायर, तारापॉलीन काढण्यासाठी तसेच आवश्यक त्या ठिकाणी उपचारासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची नेमणूकही करता येणार आहे.
– सर्व सोसायट्या तसेच व्यापारी संकुलांना त्यांच्या आवारात डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत.
डेंग्यू नियंत्रणासाठी
तपासणी केलेली घरे – १८२९७८
तपासणी केलेले कंटेनर – १९४९४३९
एडिस डासांची उत्पत्तीस्थळे – २६१३२
धूरफवारणी – ३१८२८
धूरफवारणीसाठी वापरलेले फिलिंग मशीन- ९४५६७
धूरफवारणी झालेल्या झोपड्या- १२१४८३८
ते डाऊनलोड केल्यानंतर त्यात मुंबईकरांनी स्वतःच या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या अॅपच्या मदतीने चाचणी घ्यायची आहे. या चाचण्या केल्यानंतर त्यावर येणाऱ्या गुणांकनामधून डेंग्यूचा प्रादुर्भाव होणारी उत्पत्तीस्थळे सोसायटी वा राहत्या ठिकाणांवर आहेत का याची माहिती मुंबईकरांना मिळण्यास मदत होईल अशी हे अॅप तयार करण्यामागील पालिकेची भूमिका आहे.