मुंबई, दि. 6 :- “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनीताई राजूरकर हे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्वं होतं. देशविदेशात त्यांचे चाहते होते. मुंबईत गुणीदास संमेलनाच्या, पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवासारख्या संगीत कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती संगीत रसिकांचं मन जिंकून घेत असे. महाराष्ट्राबाहेर राहूनही महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या या मराठमोळ्या नावानं कोट्यवधी रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य केलं.
संगीत नाटक अकादमी, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित मालिनीताई राजूरकरांचं निधन हा कोट्यवधी संगीत रसिकांसाठी मोठा धक्का, भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी आहे. मी मालिनीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालिनीताई राजूरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
०००००००००००