अंतरवाली सराटी या गावांमध्ये सुरू असलेल्या उपोषण स्थळी उपोषणकर्त्या निर्मला तारक आणि त्यांचे पती विजय तारक हे देखील सहभागी होते. या सोबतच त्यांच्या सासू अलका आणि मुलगा हे देखील आंदोलनामध्ये सहभागी होते. निर्मला यांनी सांगितले की, आंदोलन स्थळी भजन कीर्तन सुरू होते. यावेळी आलेल्या पोलिसांना मी स्वतः चहापाणी करून त्यांचा पाहुणचार केला. मात्र काही वेळातच अचानक काय झालं कळलचं नाही. पोलिसांनी बेदम लाठीचार्ज करायला सुरुवात केली. यामध्ये माझी पती सासू मुलगा यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी मला देखील डोक्यामध्ये मार लागला. लोक बेशुद्ध होईपर्यंत त्यांना पोलिसांनी मारलं.
त्या पुढे म्हणाल्या की, मारहाण सुरू असताना दोन गरोदर पोलीस महिला यात अडकल्या होत्या. ते बघून मी त्यांना काही इजा होऊ नये म्हणून माझ्या घरामध्ये आश्रय दिला. मी स्वतः गंभीर जखमी असतानाही मला रुग्णवाहिका मिळाली नाही. खूप अंतरावर आम्हाला पायी जावं लागलं. ज्यांना पाहुणे म्हणून पाहुणचार केला. त्यांनी आमच्यावर लाठीचार करत गोळीबार केला. यात महिला, मुलं, महिलांना बेदम मारहाण केली. अचानक घडलली परिस्थिती बघून आम्ही प्रचंड घाबरलो होतो. या घटनेमध्ये २०० पेक्षा अधिक लोक वेगवेगळ्या ठिकाणी जखमी झाले आहेत, अशी आपबीती जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी जखमी झालेल्या महिलेने सांगितली आहे.
निर्मला यांचे पती विजय यांनी सांगितले की, आदल्या दिवशी पोलीस येऊन गेले. त्यांनी गावच्या रस्त्यांची पाहणी केली. नंतर दुसऱ्या दिवशी अचानक मोठा फौजफाटा आणला. त्यांनी सांगितले की आम्ही पुन्हा जाणार आहोत. मात्र तसं झालं नाही. याउलट लाठीहल्ला सुरू झाला. जो आंदोलक मुलाबाळांना घेऊन आंदोलनात बसतो तोच कसा उद्रेक करेल, असा सवाल विजय यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, पोलीस म्हणत आहेत की आंदोलनस्थळी अनेक लोक दगडफेक करत होते. जर आम्हाला दगडफेक करायची असती तर आम्ही आमच्या कुटुंबियांना तसेच मुलं आणि आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींना उपोषण स्थळी कशाला थांबवलं असतं. हे पोलीस चुकीची माहिती देत असून घटनास्थळी कोणीही दगडफेकीचे प्रकार केला नाही. पोलिसांनीच आमच्यावर बेदम लाठीचार्ज केला.