याशिवाय पथकांमध्ये पन्नास ढोल, पंधरा ताशे व ध्वजपथकासह एकूण दीडशे ते दोनशे वादकांचा सहभाग राहणार असून, प्रत्येक वादकाच्या गळ्यात ओळखपत्र असेल; तसेच कोणतेही पथक टोलवादन करणार नाही, अशी आचारसंहिता ढोलताशा महासंघाने पथकांना घालून दिली आहे. तसेच, यंदा तीनच रांगांमध्ये होणार वादन आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या पथकांना पुढील वर्षी नोंदणी देण्याबाबत पुनर्विचार केला जाईल, असा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
‘गणेशोत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेली विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, यासाठी सर्व ढोलताशा व ध्वजपथकांकडून गणेश मंडळे व पोलिसांना सहकार्य केले जाईल,’ अशी भूमिका महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मांडली.
संजय सातपुते, विलास शिगवण, ॲड. शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, संजय शिगवण आदी महासंघाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘यंदाच्या गणेशोत्सवात १७० ढोलताशा पथकातील सुमारे २२ हजार वादक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणार आहेत. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता आदी प्रमुख विसर्जन मार्गांवर प्रथमच पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ढोलताशा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले होते. या बैठकीत ढोलताशा पथकांकडून तीनच चौकांत जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे खेळ सादर केला जाणार आहे. त्याला विलंब झाल्यास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून पथकांना पुढे जाण्याच्या सूचना केल्या जातील. गणेश मंडळे, प्रशासनासह महासंघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक समन्वय राखण्यासाठी सहकार्य करतील,’ असेही ठाकूर यांनी सांगितले.
ढोलताशा वादनकलेला हवा खेळाचा दर्जा
‘शहरात १६० आणि जिल्ह्यात २६६ बिगरशालेय ढोलताशा पथके आहेत. प्रत्येक पथकांत शंभर ते सहाशे सदस्यांचा समावेश आहे. या उपक्रमातून तरुणाईला विधायक दिशा मिळत असून, पथकांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या वादनकलेला खेळाचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदन दिले आहे,’ असेही महासंघातर्फे सांगण्यात आले.
सरावाचा कालावधी केला कमी
ढोलताशा पथकांच्या सरावांसाठी आतापर्यंत परवानगी घेतली जात नव्हती. पोलिस प्रशासनासोबत संपर्क साधून समन्वयातूनच सराव केला जात होता. यंदा प्रथमच सरावाच्या परवानगीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरावासाठी मोकळ्या जागा मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, तरीही नागरिकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका असून, त्यासाठी सरावाचा कालावधी दीड महिन्यापर्यंत कमी केला असल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.