• Sun. Sep 22nd, 2024
इमारतीचा स्लॅब कोसळून भिवंडीत दोघींचा मृत्यू; ५ जण जखमी

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : भिवंडी शहरामध्ये पडझडीच्या घटना चालूच असून, शनिवारी मध्यरात्री येथील नवीन गौरीपाडा परिसरातील दोन मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून आठ महिन्यांच्या मुलीसह एका महिलेचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांवर रुग्णालयात उपचार चालू असून, जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे.

या इमारतींचा समावेश अतिधोकादायक, तसेच धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसल्याची माहिती समोर आली असून, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पालिकाआयुक्त अजय वैद्य यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून, भिवंडीमध्ये पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

काय घडलं?

तळ अधिक दोन मजली असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या पाठीमागील स्लॅब शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता अचानक कोसळला. यावेळी ढिगाऱ्याखाली काही जण अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. भिवंडी महापालिकेचे अधिकारी, पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेमध्ये तस्निम कौसर मोमीन या आठ महिन्यांच्या चिमुकलीसह उझमा अब्दुल लतीफ मोमीन (वय ४०) या महिलेचा मृत्यू झाला. तर, अब्दुल लतीफ मोमीन (६५), फरझाना अब्दुल लतीफ मोमीन (५०), बुसरा अतीफ मोमीन (३२), आदिया अतीफ मोमीन (७ वर्ष), उरुसा अतीफ मोमीन (३ वर्ष) जखमी झाले. सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तत्काळ भिवंडीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, आयजीएम रुग्णालयात उपचार घेणारी उरुसा हिची प्रकृती स्थिर असल्याने तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या चौघा जखमींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पहाटे ३.३० वाजता बचावकार्य थांबवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही दुर्घटना घडली, तेव्हा इमारतीच्या तळमजल्यावर असलेला पॉवरलूम कारखाना बंद होता.

इमारतीचे बांधकाम ३० वर्षे जुने असल्याची माहिती पालिकाआयुक्त अजय वैद्य यांनी दिली. शिवाय ही इमारत अतिधोकादायक, तसेच धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही करून घेण्याविषयी सांगितले होते. मात्र, ऑडिट केले नसल्याचे आयुक्त म्हणाले. इमारतीच्या तळमजल्यावर पॉवरलून कारखाना असल्याने कदाचित सततच्या व्हायब्रेशनमुळे इमारत खिळखिळी झाली असावी, अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्ती केली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पाडण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या दुर्घटनेनंतर पालिकाआयुक्तांनी तातडीची बैठक घेऊन, भिवंडीमध्ये पुन्हा इमारत दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी काही उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत.

आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

दुर्घटनांचे सत्र कायम

– २०१७ – नवीवस्ती भागातील कोरी बंगला इमारत कोसळून दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.
– २०१८ – खोणी गावात तीन मजली धोकादायक इमारत चाळ आणि शौचालयावर कोसळली होती. यात एक महिला ठार, तर आठ जण जखमी झाले होते.
– २०२० – भिवंडीमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली होती. तीन मजली जिलानी इमारतीचा एक भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला होता.
एप्रिल २०२३ – वळगावात तीन मजली इमारतीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग कोसळून आठ जणांना प्राण गमवावे लागले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed