IMD च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या निरीक्षणानुसार ही प्रणाली बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम भागात तयार होण्याची शक्यता आहे. हे राज्यासाठी एक सकारात्मक संकेत आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनचे पुनरागमन होण्याची आम्हाला अपेक्षा आहे”.
आयएमडीने गेल्या तीन दिवसांत घाट परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद केली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत शहरात हलक्या पावसाचा अंदाज अधिकाऱ्यांनी आधीच वर्तवला आहे. रविवारी पहाटे निरभ्र आकाश होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र, रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पुणे शहरात पाऊस झाला नाही.
मध्य महाराष्ट्रात, फक्त सोलापूरमध्ये ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर विभागातील इतर हवामान केंद्रांवर पावसाची नोंद झालेली नाही. “पुणे जिल्ह्याचा समावेश असलेल्या मध्य महाराष्ट्र भागात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढेल. पुणे शहर आणि परिसरात ४ ते ७ सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस पडेल. येत्या काही दिवसांत घाट परिसरातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडू शकतो”, असं आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
IMD ने मराठवाडा विभागासाठी ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. या प्रदेशात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी उस्मानाबादेत २६ मिमी आणि नांदेडमध्ये १८ मिमी पावसाची नोंद झाली.
त्याचप्रमाणे विदर्भात ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रत्यक्षात, रविवारी काही ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं आहे. वर्धा येथे ५१ मिमी, नागपूर ४५ मिमी, चंद्रपूर २७ मिमी, ब्रह्मपुरी १० मिमी, बुलडाणा ८ मिमी आणि गोंदियामध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील खरीप पिके वाचवण्यासाठी मान्सून पुन्हा सुरू होणे ही काळाची गरज आहे.