• Mon. Nov 25th, 2024

    आंदोलनाचा फटका; दिवसभरात लांब पल्याची एकही बस धावली नाही, अनेक बसेस रद्द, प्रवाशांचे झाले हाल

    आंदोलनाचा फटका; दिवसभरात लांब पल्याची एकही बस धावली नाही, अनेक बसेस रद्द, प्रवाशांचे झाले हाल

    नांदेड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेनंतर शनिवारी राज्यभर निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून लांब पल्याच्या गाड्या रद्द केली आहे. नांदेडसह जिल्ह्यातील इतर आगारातून द‍िवसभर लांब पल्याच्या बस सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दिवसभर बसस्थानकात ताटकळत रहावे लागले. अचानक बस रद्द झाल्याने प्रवश्यांची तारांबळ उडाली होती.

    नांदेड आगारातून हिंगोली, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, बिदर, जालना, संभाजीनगर,अकोला, बीड आदी मार्गावरील लांब पल्याच्या रद्द करण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातही बस सोडण्यात आली नाही. नांदेड आगारातून शेकडोच्या संख्येने प्रवासी बसमधून प्रवास करत असतात. मात्र अचानक घेतलेल्या बंदच्या निर्णयामुळे बस स्थानकात आलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. तासंतास प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. नांदेड आगारातून दररोज ११६ बसेस धावत असतात. त्यातून नांदेड आगाराला दररोज ११ लाखाचे उत्पन्न होते. पण आज लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने नांदेड आगाराला पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या पुढील सूचनेनंतर लांब पल्याच्या बसेस पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती नांदेड आगार प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.

    सोमवारी नांदेड बंदची हाक

    जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजा तर्फे सोमवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलकांना लाठीचार्ज करणाऱ्या जालना येथील पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्याची मागणी सकल मराठा समाजा तर्फे करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नांदेड शहरासह जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलकाकडून टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहूर तालुक्यात टायर जाळून घटनेचा निषेध करण्यात आला. माहूर बंद देखील ठेवण्यात आले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *