मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेची राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर पालिकेचे प्रयत्न सुरू असून यांत्रिक झाडूंचा वापर हा त्यापैकी एक पर्याय आहे. शहर व पूर्व उपनगरांसाठी चार व पश्चिम उपनगरांसाठी पाच यांत्रिक झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. या प्रस्तावाला पालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. वेहिकल माऊंटन (वाहनारूढ) पद्धतीच्या या नऊ झाडूंची खरेदी आणि चार वर्षे देखभालीसाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पश्चिम उपनगरांतील पाच झाडूंसाठी २३ कोटी २० लाख रुपये आणि अन्य चार झाडूंसाठी १९ कोटी २२ लाख रुपये खर्च आला आहे. वातावरणातील बदल आणि सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीने हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. रस्त्यांवरील कचरा व धूळ साफ करण्यासाठी पालिकेतर्फे पारंपरिक हिराचे झाडू व मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो. मात्र या पद्धतीने साफसफाई करताना वातावरणात धूळ उडते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून यांत्रिक झाडूचा पर्याय पुढे आला आहे.
यांत्रिक स्वच्छता
पालिकेच्या ताफ्यात सध्या २७ यांत्रिक झाडू असून त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किमी लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येते. नवीन घेतल्या जाणाऱ्या झाडूने रस्ते, पदपथ आणि दुभाजकांचीही सफाई करण्यात येणार आहे. एका रस्त्याच्या चार फेऱ्या याप्रमाणे एका झाडूद्वारे ३० किमी इतके अंतर स्वच्छता केली जाणार आहे. झाडू खरेदीसाठी कंत्राटदाराला पत्र देखील दिले आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.