• Sat. Sep 21st, 2024
मराठा आंदोलकांवर लाठीमार दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करणार; उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांचा शब्द

मुंबई: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला प्रकरण चिघळलं; जालन्यातील घटनेचे बीडमध्ये पडसाद, जिल्हा बंदची हाक
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या घटनेची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून माहिती घेतली आहे. मी या आंदोलनाच्या नेत्यांशी देखील संवाद साधला होता. त्यांच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगतानाच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र आंदोलनावर ते ठाम राहिल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्यांना भेटायला गेले होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी विनंती देखील त्यांनी केली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका राज्य शासनाची आहे. या समाजाला न्याय देण्याची भावना आणि भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

जालना मराठा आंदोलन: गृहमंत्री फडणवीस म्हणाले, घटना दुर्देवी, आम्ही त्यांची समजूत काढत होतो…

दरम्यान जालना शहरातील चंदनझीरा, नागेवाडी, दावलवाडी तसेच अंबड रोडवरील आंतरवाली येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर दोन्ही बाजूने टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे औरंगाबाद-जालना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली असून जालना-अंबड महामार्गावर अंतरवाली येथे एक ट्रक आणि कार जाळण्यात आली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. यावेळी आंदोलकांच्या वतीने राज्य शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. या घटनेच्या निषेधार्ह मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात येत आहे. आरोग्य सुविधा, शाळा आणि महाविद्यालय सोडता सर्व व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूक, बाजारपेठा बंद ठेवून समस्त जालना करांनी सहकार्य करावे, अशी विनंती जालना जिल्हा मराठा मोर्चा वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed