• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर करण्यात आला. या अंदाजानुसार राज्यात या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जास्त आहे. अनेक जिल्ह्यांत ऑगस्टअखेरपर्यंत अपुरा पाऊस नोंदला गेला असताना, सप्टेंबरमध्येही पाऊसमान कमी राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील पर्जन्यमानाचे आकडेही बदलले आहेत. राज्यात मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. मात्र, याच कालावधीत कोकणात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात २३ टक्के कमी, मराठवाड्यात २१ टक्के कमी आणि विदर्भात १८ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे.

‘आयएमडी’ने गुरुवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, ‘सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य, पूर्व भारताचा काही भाग आणि हिमालयाच्या पायथ्याकडील भाग वगळता इतरत्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे. सप्टेंबरमधील पावसाची राष्ट्रीय सरासरी १६८ मिमी आहे.’

मुंबईत पोहोचताच राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल; गौतम अदानींबाबत केला नवा आरोप

सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. याचा थेट परिणाम पिकांवर, तसेच जमिनीतील आर्द्रतेवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मान्सूनच्या आगामी स्थितीबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘एल निनोचा थेट परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धावर झाल्याचे दिसते आहे. ऑगस्टमध्ये मान्सूनचा अक्ष (मान्सून ट्रफ) बहुतांश काळ सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेला, हिमालयाच्या पायथ्याशी राहिला. त्यामुळे या काळात कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली नाहीत. सप्टेंबरमध्ये मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) या ढगांच्या क्षेत्रामुळे काही काळ मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याची तीव्रता फार नसेल. त्यानंतर पावसात पुन्हा खंड पडू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे.’

बंगालच्या उपसागरात ६ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र?

‘आयएमडी’च्या विस्तारित हवामान अंदाजामध्ये दीर्घ काळ ‘ब्रेक’ स्थितीत असणारा मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीला सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. या अंदाजानुसार ४ सप्टेंबरला वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यापुढील ४८ तासांत म्हणजे ६ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. हे क्षेत्र पश्चिम-वायव्येला सरकून मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढू शकते.

ऑगस्टमधील विभागनिहाय पावसाची तूट (टक्क्यांत)

कोकणात – ५६

विदर्भ – ५१

मध्य महाराष्ट्र – ६४

मराठवाडा – ७४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed