• Sat. Sep 21st, 2024

पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; एसटीकडून खास स्लीपर कोच बसेस धावणार, कधीपासून सुरू?

पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; एसटीकडून खास स्लीपर कोच बसेस धावणार, कधीपासून सुरू?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) या मार्गावर स्लीपर कोच बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये या बसेस सुरू होऊ शकतात, अशी माहिती आहे.

नागपूर, विदर्भातील तरुण नोकरीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पुण्यात वास्तव्याला आहेत. सणांच्या काळात ते कुटुंबासह घरी येतात, त्यावेळी बस, रेल्वे, विमान या सर्वांचेच आरक्षण फुल्ल झाले असते. तिकिटाचे दरही अव्वाच्या सव्वा झालेले असतात. या मार्गावर एसटीच्या बसेस आहेत. मात्र, त्या स्लीपर नाहीत. त्यामुळे १५-१६ तास बसून प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे एकीकडे ट्रॅव्हल्समध्ये जागा मिळत नसताना एसटीला मात्र प्रवाशांची प्रतीक्षा असते. आता एसटीने स्लीपर कोच सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

मुंबईत पोहोचताच राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल; गौतम अदानींबाबत केला नवा आरोप

सुरक्षा आणि शुल्क या दोन्ही दृष्टींनी विचार केल्यास एसटीने प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु, खासगी ट्रॅव्हल्सतर्फे मिळणाऱ्या सुविधा एसटी देत नसल्याने लोक नाईलाजाने ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. परंतु, आता एसटीने स्वत:च स्लीपर कोच गाड्यांची निर्मिती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून पुण्यासाठी दररोज दोन स्लीपर कोच बसेस सुटतील. यातील एक दुपारी १२ वाजता व दुसरी सायंकाळी ५ वाजता सुटेल. साधारणत: १४ ते १५ तासांनी ही बस पुण्याला पोहचेल. अशाच वेळा पुण्यातून येताना राहतील. या गाड्यांमध्ये १५ स्लीपर, तर ३० नियमित आसने राहणार आहेत. नागपूर-पुणे या प्रवासाचे तिकीट साधारण १५०० रुपये राहील.

अशा आहेत सुविधा

खिडक्यांना आकर्षक रंगाचे पडदे, प्रवाशांना झोपण्यासाठी गादी आणि उशी एकत्र, प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा, पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी सुविधा, प्रत्येक बर्थमध्ये रीडिंग लॅम्प, चालकाजवळ उद्घोषणा करण्यासाठी माइक अशा सुविधा या बसमध्ये असणार आहेत. नागपूर-पुणे-नागपूरदरम्यान एसटीची स्लीपर कोच सुरू व्हावी, ही जुनी मागणी होती. ती पूर्ण होत असेल तर निश्चितच आनंदाची बाब आहे, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed