घटना जुलैमधील आहे. रामप्रसाद (बदललेले नाव) दहा वर्षांची मुलगी प्रिया हिला घेऊन रात्रीच्या वेळेस कुरार पोलिस ठाण्यात आला. प्रिया ही दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी असून, तिची आई सोडून गेल्याने ती मामाकडे वसईला राहत होती. मात्र, तिथे राहायचे नसल्याने ती वारंवार घरातून एकटीच निघून कुरारला येत असल्याचे रामप्रसाद याने सांगितले. पहिली पत्नी तिला स्वीकारायला तयार नाही आणि कामधंदा काहीच नसल्याने मला तिचा सांभाळ करता येणार नसल्याचे तो सांगू लागला. कर्तव्यावरील उपनिरीक्षक मृणाल माने यांनी या मुलीला आपुलकीने जवळ घेऊन तिची विचारपूस केली. अशा परिस्थिती या मुलीला पुन्हा रामप्रसादसोबत सोडणे किंवा तिच्या पहिल्या पत्नीकडे सोडणे उचित नव्हते. माने यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ निरीक्षक संतोष गाढवे, निरीक्षक संजीव गावडे यांना दिली. प्रिया हिला अंधारमय आयुष्यात ढकलणे अयोग्य असल्याने पोलिसांनी यावर बालकल्याण समितीपुढे तोडगा काढण्याचे ठरविले.
पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माने यांच्यासह कांचन बिडवे, आशा ठमके यांच्या पथकाने प्रियाची मुलीप्रमाणे काळजी घेत बालकल्याण समितीकडे पाठपुरावा सुरू ठेवला. दरम्यान रामप्रसाद यांच्या शेजारी राहणारी एक महिला प्रियाचा सांभाळ करण्यासाठी पुढे आली. मात्र, पोलिसांनी शहानिशा केली असता, तिच्या कुटुंबातील काही जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे कळले. प्रिया हिला सुरक्षित ठिकाणी ठेवणे यासाठी पोलिसांची धडपड सुरू होती. पोलिसांनी वडिलांसह तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले आणि पोलिस चौकशीतील सर्व तथ्ये समितीपुढे ठेवली. समितीने सर्व अंगानी सारासार विचार करीत प्रियाला सद्यस्थितीत काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याचे मान्य केले. त्यानुसार अंधेरी येथील एका संस्थेच्या आश्रमात प्रियाला वयाची अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. वडिलांनी पोलिस ठाण्यात आणल्यामुळे आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतल्याने अखेर प्रिया सुरक्षित स्थळी पोहोचली.