• Mon. Nov 25th, 2024
    कौटुंबिक वादातून पती व सासूची गर्भवतीला मारहाण; नवजात बाळ दगावले

    म. टा. वृत्तसेवा, गोंदिया

    कौटुंबिक वादातून पती आणि सासूने गर्भवती सूनेला मारहाण केल्याने तिची प्रसूती होऊन नवजात बाळ दगावले. याप्रकरणात तिरोडा पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    तिरोडा तालुक्यातील येडामाकोट येथे सावन सुनील मुटकुरे (२८) ही गर्भवती असताना २५ ऑगस्ट रोजी पती सुनील व सासू हिरामोती मुटकुरे यांनी घरातील कामे करीत नाही,आपल्या वडिलांना पैसे देत असल्याचे आरोप केले. यातूनच तिचा छळ सुरू केला. सततच्या भांडणांमुळे सावन ही घर सोडून जाण्यास निघाली. यावरून संतापलेल्या सासूने काठीने पाठीवर, पायावर व मानेवर वार केले. पती सुनीलनेही मारहाण केली. यातूनच तिला त्रास सुरू झाल्याने मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

    डॉक्टरांनी लवकर प्रसूती होऊ शकते, असे सांगितले. त्यामुळे सुनील याने गोंदिया येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये भरती केले. २६ ऑगस्ट रोजी प्रसूती होऊन बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सावन हिने गर्भवती असताना सासू व पतीने मारहाण केल्यामुळे तिचे बाळ दगावले, असे पोलिसांना सांगितले. त्यावरून तिरोडा पोलिसांनी सासू व पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

    ‘आम्ही बाई गंगाबाई रुग्णालयातील तिची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत,’ असे तिरोड्याचे पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed