सिद्धार्थ कॉलेजमध्ये जवळपास एक लाख ४० हजार इतकी विपुल ग्रंथसंपदा आहे. यातील अनेक ग्रंथ दुर्मीळ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कॉलेजशी स्थापनेपासून संलग्न होते. त्यांचा वावर संपूर्ण कॉलेजमध्ये राहिला असून, त्याच्या खुणा जपणे आवश्यक आहे. त्यांची अनेक पुस्तके आणि त्यांनी केलेल्या नोंदी कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. मात्र, काळाच्या ओघात ही पुस्तके जीर्ण झाली आहेत. त्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. त्यासाठी श्रीपाद हळबे आणि सुलभा हळबे या भावा-बहिणींनी ३५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. आता जापनीज टिश्यू लेन्स टेक्नॉलॉजी या पद्धतीने या पुस्तकांचे जतन केले जात आहे; तसेच त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या ग्रंथांच्या स्कॅनिंगचे काम आठवडाभरात सुरू होईल, अशी माहिती सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सुनतकारी यांनी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हाताने लिहिलेल्या अनेक नोंदींचाही यात समावेश आहे. त्यामध्ये त्यांनी ‘रिपब्लिक’ शब्दाच्या अर्थच्छेदापासून उलगडून सांगितलेल्या नोंदी, व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी यांचाही समावेश आहे. बाळंतपणावेळी महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेबाबत संसदेत कायदा संमत करावा यासाठी करण्यात येणाऱ्या चर्चेच्या त्यांनी स्वतः लिहिलेल्या टिपणांचाही यात समावेश आहे. संग्रहविद्येचे जाणकार अमोल दिवकर त्यांच्या साथीदारांसह आणि कॉलेजच्या ग्रंथपाल चैताली शिंदे यांच्या मदतीने मागील काही महिन्यांपासून या विविध साहित्याचे जतन करण्याचे काम करत आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे, असे प्राचार्य सुनतकारी यांनी नमूद केले.
कॉलेजच्या इमारतीचा पुनर्विकास, ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि संशोधन कार्य ही महत्त्वपूर्ण कामेही कॉलेजकडून हाती घेण्यात येणार आहेत. यातील इमारत पुनर्विकासासाठी सुमारे २० कोटी रुपये, ग्रंथालयासाठी ३४ कोटी रुपये आणि संशोधन कार्यासाठी १० कोटी रुपयांची गरज आहे. हे प्रस्ताव विविध सरकारी विभाग आणि संस्थांना दिले असून, आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.