वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे अस्तित्व दिसून आले होते. आंबोली, तिलारी व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर आहे. काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे. कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. घनदाट जंगलात राहत असल्याने त्यांचा रंग बदलतो, अशी माहिती वन्य प्राणी तज्ञ सुभाष पुराणिक यांनी दिली आहे.
संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आंबोलीतील जैवविविधता अतिशय संपन्न समजली जाते. हत्ती, वाघ, बिबटे आणि दुर्मिळ पशुपक्षी, बेडूक साप असे सर्व एकत्र सापडणारे जैवविविधतेने संपन्न असलेले ठिकाण म्हणजे आंबोली. याच आंबोली परिसरात तेजस ठाकरे व अन्य काही वन्य प्राणी अभ्यासकांनी सापाच्या बेडकांच्या तसेच फुलपाखरांच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत.
कोल्हापूर येथील मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तात्काळ वन विभागाला याबद्दल कळवले. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांनाही याबाबत कल्पना दिली.
काही वर्षांपूर्वी आंबोली येथील वसंत ओगले यांना सुद्धा चौकुळ या रस्त्यावर काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. २०२० मध्ये आंबोली येथील पूर्वीचा वस परिसरात काही पर्यटक युवकांना ब्लॅक पँथर दिसून आला होता.
काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात.
आता या घटनेमुळे काही वर्षांपूर्वी याठिकाणी आढळलेल्या ब्लॅक पँथरची पुन्हा एकदा आठवण झाली. याबाबतील चर्चेला वनविभागाचे निवृत्त अधिकारी तथा वन्यप्राणी तज्ञ सुभाष पुराणिक यांनी दुजोरा देत आंबोली जंगलात यापूर्वी अनेकदा अशा प्रकारचे काळ्या रंगाचे पँथर आढळले आहेत, अस दावा त्यांनी यावेळी केला.