• Sat. Sep 21st, 2024

बहुचर्चित ‘विक्रम’ला मुंबईचे इंजिन; ‘या’ कंपनीचा चांद्रयान ३ मोहिमेशी आहे खास संबंध

बहुचर्चित ‘विक्रम’ला मुंबईचे इंजिन; ‘या’ कंपनीचा चांद्रयान ३ मोहिमेशी आहे खास संबंध

मुंबई : यशस्वी झालेल्या चांद्रयान मोहिमेतील बहुचर्चित ‘प्रग्यान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडरला इंजिनाची रसद मुंबईचे पुरवली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या भागांसाठीचे ‘थ्रस्टर’ प्रकारचे इंजिन गोदरेज एअरोस्पेसच्या विक्रोळीतील कारखान्यात तयार झाले आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) या मोहिमेसाठी देशांतर्गत कंपन्यांकडून विविध सामग्री घेतली होती. प्रत्यक्ष यानाला बल देणारे ‘बूस्टर्स’ एल अॅण्ड टीकडून खरेदी करण्यात आले होते. टाटा कन्सलटन्सी इंजिनीअरिंग लिमिटेडने यानासाठीचे पंख व अन्य सामग्रीसाठीचे अभियांत्रिकी काम केले होते. तर यानाला पृथ्वीच्या कक्षेपर्यंत नेण्यासाठीचे दोन ‘विकास’ इंजिन, अवकाशातील प्रवासाठीचे क्रायोजनिक इंजिन हे गोदरेज एअरोस्पेसने तयार केले होते. याखेरीज बुधवार, २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलेल्या ‘प्रग्यान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडरमध्येही गोदरेजचा महत्त्वाचा सहभाग होता.

यासंबंधित सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडर हे प्रग्यान रोव्हरच्या आत होते. प्रग्यान रोव्हर दोन दिवसांपासून चंद्राला प्रदक्षिणा घालत होते. अखेरच्या टप्प्यात ३० किलोमीटर उंचीवरून ११ मिनिटांत चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलेले प्रग्यान रोव्हरच होते. त्या प्रग्यान रोव्हरमधून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. रोव्हर व लँडर या दोन्हीला प्रत्येकी दोन थ्रस्टर प्रकारचे कमी क्षमतेचे इंजिन बसविण्यात आले होते. हे इंजिन गोदरेज एअरोस्पेसच्या विक्रोळी येथील कारखान्यात तयार झाले होते.’

‘थ्रस्टर्स’ हे गुरुत्वाकर्षण नसलेल्या भागात यानाला बळ देणारे इंजिन असते. याअंतर्गत प्रग्यान रोव्हरला ‘४८०० न्यूटन’ बळ देण्यात आले. हे बळ जवळपास ४०८ किलो होते, अशी माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान विक्रम लँडरचे हे यश गोदरेजच्या कारखान्यात या प्रकल्पात गुंतलेले अभियंते व कर्मचाऱ्यांनी बुधवारी एकत्र अनुभवले.
Chandrayaan 3 : चांद्रयान ३चे यशस्वी लॅंडिंग; जाणून घ्या चंद्रावर पुढील १४ दिवसांत काय होणार?
स्वदेशी उत्पादनांच्या सामर्थ्यावरील विश्वास

‘चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ यशस्वीपणे उतरवल्याबद्दल आम्ही इस्रोचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे यश भारताच्या अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानातील उल्लेखनीय प्रगतीचा पुरावा आहे. यापुढेही आम्ही देशाच्या वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासात सातत्याने योगदान देत राहू. हे यश स्वदेशी उत्पादनाच्या सामर्थ्यावरील विश्वास आणि तांत्रिक नवकल्पनांच्या सीमांना पुढे नेण्यातील आमचे योगदान अधिक दृढ करते.’- जमशेद गोदरेज, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,गोदरेज अॅण्ड बॉयस कंपनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed