• Sat. Sep 21st, 2024

घुसखोरांची वीज अन् पाणी कनेक्शन कापणार; संक्रमण शिबिरांबाबत म्हाडाचा निर्णय

घुसखोरांची वीज अन् पाणी कनेक्शन कापणार; संक्रमण शिबिरांबाबत म्हाडाचा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरात मुक्काम ठोकून असलेल्या व भाडे थकवणाऱ्या घुसखोर रहिवाशांवर आता कठोर कारवाई होणार आहे. म्हाडाच्या दक्षता विभागाने अशा घुसखोर रहिवाशांची वीज, पाणीजोडणी कापण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईचा अहवाल मागविण्याचा निर्णयही दक्षता विभागाने घेतला आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केल्यानंतर तिथल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली जाते. ऐन पावसाळ्यात अशा इमारती कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी म्हाडाकडून तेथील घरांची वीज, पाणीजोडणी कापण्याच्या नोटिसा दिल्या जातात. त्यापाठोपाठ आता म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरांचे भाडे थकविणाऱ्या घुसखोर रहिवाशांवर कारवाई केली जाणार आहे. संक्रमण शिबिरातील घराचे मासिक भाडे तसेच थकबाकी न भरणाऱ्या घुसखोर रहिवाशांचे पाणी, वीजजोडणी कापण्याची कारवाई करण्याची वेळ आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच होणार पुनर्विकास
मुंबई शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी तेथील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरात निवारा देण्याची योजना आहे. मात्र, तिथे कालांतराने मूळ रहिवाशांऐवजी घुसखोरांची संख्या वाढत गेली. त्यावर वारंवार कारवाई करूनही अनेक संक्रमण शिबिरांमध्ये घुसखोरांचाच वावर अधिक आहे. हा प्रश्न निकालात काढण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी या घुसखोरांना अधिकृत करण्याचे धोरण राबवले. तरीही संक्रमण शिबिरातील घुसखोरीची समस्या सुटलेली नाही. घुसखोर रहिवाशांकडून त्या घराचे मासिक भाडे भरले जात नसल्याने त्याचा भार मंडळावर पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed