ऑगस्ट महिन्यापासून कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली होती. घाऊक बाजारात ८ ते १२ रु. किलोपर्यंत असणारे कांद्याचे भाव दोन आठवड्यांत २५ ते २७ रु. किलोवर पोहोचले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात कांदा ३५ रु. किलो झाला होता. हे भाव गणेशोत्सवावेळी ५० रुपये किलोच्याही पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकीकडे भाव वाढत असताना कांद्याची निर्यातही सुरू होती. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला व्यापारी व निर्यातदारांनी विरोध दर्शवला आहे.
निर्यातशुल्काच्या विरोधात सर्व ठिकाणच्या बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कांद्याचे भाव पडले तर कांद्याला जो काही भाव मिळतोय तोही मिळणार नाही या भीतीने सर्व शेतकऱ्यांनी कांदा मुंबई बाजारात पाठवून दिला. त्यामुळे सोमवारी वाशीच्या बाजारात कांद्याच्या १३५ गाड्यांची आवक झाली. इतरवेळी ही आवक ८० ते १०० इतकी असते. कांद्याची आवक वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्या उपलब्ध झाला. तर, कांद्यावर निर्यातशुल्क लागू झाल्याने निर्यातदारांनी कांद्याची खरेदी थांबवली आहे.
परिणामी वाशी बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याचे चित्र होते. किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांद्याची जेमतेमच खरेदी केली. सोमवारी कांद्याचा भाव किलोमागे पाच रुपयांनी कमी झाला. तो आणखी घसरू शकतो, अशी प्रतिक्रिया काही खरेदीदारांनी व्यक्त केली. मात्र, सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, यावर हे कांद्याचा भाव अवलंबून असेल, अशी माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.