• Sat. Sep 21st, 2024
Nashik News LIVE Updates : ‘आप’मधून निलंबन, जितेंद्र भावेंचा नवा पक्ष, नाव ठेवलं…

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : वंचित, शोषित, पीडितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र पार्टी’ या पक्षाची स्थापन करीत असल्याची घोषणा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी रविवारी नाशिकमध्ये केली. आम आदमी पक्षाने निलंबित केल्यानंतर महिनाभरातच नवीन पक्षाची स्थापना करून भावे यांनी रणशिंग फुंकले आहे.

महापालिकेसह आगामी सर्व निवडणुकांत सर्व जागांवर आम्ही उमेदवार देऊ, असेही भावे यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले. आम आदमी पक्षाचे राज्य समिती सदस्य, प्रवक्ता आणि नाशिक कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर भावे यांनी यापूर्वी काम केले. परंतु, पक्षशिस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका ठेवून जुलैअखेरीस ‘आप’ने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर महिनाभराच्या आतच भावे यांनी स्वत:च्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.

करोना काळात खासगी हॉस्पिटल्सकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांविरोधात आवाज उठविल्याने भावे अधिक चर्चेत आले. भ्रष्टाचार आणि लाचखोरीबाबत आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने त्यांना नागरिकांचे पाठबळ मिळत आहे. या पाठबळावरच नवीन पक्षाची स्थापना करीत असल्याचे भावे यांनी मेळाव्यात जाहीर केले. आम आदमी पक्षात बोलण्यावर मर्यादा येत होत्या, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गेल्या चार महिन्यांत नाशिकमध्ये लाचखोरीची ११९ प्रकरणे पुढे आली आहेत. व्यवस्था बदलण्यासाठी आमचा पक्ष काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील सहा महिने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र हे पक्षाचे कार्यक्षेत्र राहणार असून, हळूहळू राज्यभर पक्षाचा विस्तार करण्यात येईल, अशी माहितीही भावे यांनी दिली.

श्रावण महिन्याचा उपवास महागला! शेंगदाणे, साबुदाण्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, जाणून घ्या किंमती?

‘सीटीईटी’ केंद्राबाहेर झुंबड

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आलेल्या वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालय येथे रविवारी परीक्षार्थींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पाथर्डी फाटा-देवळाली कॅम्प-विहितगाव-नाशिकरोड या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने परीक्षार्थी हजेरी लावणार असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणा याबाबत अनभिज्ञ राहिल्याने असंख्य परीक्षार्थींना ठप्प पडलेल्या रहदारीतून पायपीट करीत परीक्षा केंद्र गाठावे लागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (सीटीईटी) रविवारी दोन सत्रांत आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी नाशिकरोड विभागातील वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालय येथे केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर नाशिक जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतूनदेखील परीक्षार्थी परीक्षेसाठी आलेले होते.

परीक्षार्थींची जास्त संख्या आणि त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक व त्यांची वाहने यांची या परीक्षा केंद्राकडे येणाऱ्या रस्त्यावर एकच गर्दी झाल्याने या रस्त्यावरील वाहतुकीचा फज्जा उडाला होता. दुपारी बाराच्या दरम्यान सकाळ सत्रातील परीक्षा केंद्राबाहेर आलेले विद्यार्थी आणि दुपार सत्रातील पेपरसाठी बाराला रिपोर्टिंगसाठी हजर असलेले विद्यार्थी यांची वेळ एकच झाल्याने हा संपूर्ण रस्ता गर्दीने व्यापला गेला. परिणामी या मार्गावरील रहदारी ठप्प झाली. त्यामुळे दोन्हीही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे दुपार सत्रातील अनेक परीक्षार्थींना मोठी पायपीट करून परीक्षा केंद्र गाठावे लागले. वाहतूक पोलिसांना मात्र या समस्येचा शेवटपपर्यंत थांगपत्ताही लागला नाही. त्यामुळे परीक्षार्थींसह नागरिक, वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; ४० टक्के निर्यात शुल्कामुळे बळीराजावर नवं संकट

दातीर खूनप्रकरणी शस्त्र पुरवणारा संशयित ताब्यात

अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणातील मुख्य संशयित करण कडूस्कर याला धारदार शस्त्र पुरवणारा तसेच खून होणार असल्याची माहिती असतानाही पोलिसांची दिशाभूल करणारा शुभम श्यामराव दातीर (वय २२) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५५ वर्ष राजकारणात अनेक धोक्यातून गेलोय; मारणाऱ्याला बक्षीस; छगन भुजबळांचं थेट उत्तर

गेल्या आठवड्यात हनुमान मंदिर चौकात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मयूर केशव दातीर (वय २१) याच्यावर धारदार शस्त्र, चॉपरच्या सहाय्याने छातीवर तसेच पोटात सपासप वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित करण अण्णा कडुस्कर, मुकेश मगर, रवी आहेर यांना आश्रय देणारा राकेश शेलार या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य संशयित करण कडुस्कर यास हत्यार कुठून आणले, याबाबत विचारणा केली असता त्याने चॉपर हा मृत मयूर दातीर याचा नातेवाईक शुभम दातीर याने पुरविल्याची कबुली दिली. यानुसार अंबड पोलिसांनी संशयित शुभम दातीर यास अटक केली. शुभम याची चौकशी केली असता संशयित करण हा मयूरचा खून करणार असल्याची माहिती १७ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शुभमला माहिती असल्याचे समोर आले. मात्र, शुभमने पोलिसांसोबत राहून घटना घडल्यानंतरही संशयित करणला पकडून देण्यासाठी मदत करतो, असे पोलिसांना भासवून दिशाभूल केली. शुभम यास २५ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. सदर माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed