काय प्रकरण?
कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या पार्किंगमधून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अमर अंबुरे यांची दुचाकी चोरीला गेली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी कळवा पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हय्या थोरात यांनी पोलिस निरीक्षक जितेंद्र कुंवर, पोलिस उपनिरीक्षक किरण बघडाणे आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. पोलिस हवालदार संदीप महाडिक यांनी घटनास्थळावरील तसेच आसपासच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची बारकाईने पाहणी केली. आरोपींचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग हा नाशिक हायवेमार्गे कल्याण-मुरबाड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक बघडाणे आणि त्यांच्या पथकाने मुरबाड तालुक्यातील टोकावडे तसेच कल्याणमधील आधारवाडी येथून गणेश म्हाडसे (३२) आणि किशोर साबळे (३१) यांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे मुरबाडचे असून चौकशीमध्ये त्यांनी दुचाकी चोरील्याची कबुली दिली.
पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर गणेशने ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुरबाड परिसरात दुचाकी चोरी केल्याची बाब समोर आली. चोरलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री केली जात असल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. पोलिसांनी १५ गुन्ह्यांची उकल करत ३ लाख २९ हजार ८७५ रुपयांच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी गणेश कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दुचाकीचोरी करण्यास सुरुवात केली. कर्ज फिटल्यानंतरही पैशाच्या हव्यासापोटी दुचाकी चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.