• Mon. Nov 25th, 2024

    ‘मोबाइल गेम’ रोखण्यासाठी कारागृहात आता कॉइन बॉक्स; सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

    ‘मोबाइल गेम’ रोखण्यासाठी कारागृहात आता कॉइन बॉक्स; सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कारागृहातील बंदीवानांकडे आढळून येणाऱ्या मोबाइल फोनमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अनेकदा भेदल्याचे आढळून येत होते. मात्र, आता यावर तोडगा शोधून काढण्यात आला आहे. कारागृहात कॉइन बॉक्स लावून बंदीवानांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे कॉल रेकॉर्ड कारागृह प्रशासनाकडे राहील. शिवाय, गैरप्रकारांनाही आळा बसेल, असा विश्वास कारागृह प्रशासनाला आहे.

    मोबाइल फोनचा वापर कारागृहातील बंदीवानांकडून सर्रासपणे करण्यात येत असल्याच्या घटना अलीकडच्या काही वर्षात चांगल्याच वाढल्या होत्या. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. कारागृहात असूनही बाहेर संपर्क ठेवून गुन्हेगारी जगत चालवण्याचे काम बंदीवानांकडून मोबाइलच्या माध्यमातून अगदी सहजपणे सुरू होते. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यावर तोडगा म्हणून आता थेट कारागृहात कॉइन बॉक्स लावण्यात येत आहेत. त्यानुषंगाने बंदीवानांना स्मार्टकार्ड देऊन त्याद्वारे महिन्यातून एकदा नातेवाइकांशी बोलण्याची मुभा देण्यात येईल. स्मार्टकार्डच्या माध्यमातून कॉल कुठे केला आहे, याची माहिती कारागृह प्रशासनाकडे राहणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी नागपुरात दिली. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याबाबत संपूर्ण माहिती राज्याच्या गृहमंत्रालयात देण्यात आली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यावेळी कारागृह महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अधीक्षक वैभव आगे उपस्थित होते.

    क्षमता वाढवणार!

    राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कारागृहांची क्षमता सहा हजारांनी वाढविण्यात येणार असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी यावेळी दिली. वाढीव क्षमतेसाठी राज्याच्या गृहमंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यानुसार, राज्यात असलेल्या ६० कारागृहांमध्ये सध्या २५ हजार बंदीवानांची क्षमता आहे. मात्र, कारागृहात ४२ हजारांवर बंदीवान आहेत. आधीच क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असल्याने कारागृह प्रशासनावर ताण येत आहे. अशावेळी त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राज्यात ठाणे कारागृहात ५००, पालघरमध्ये १ हजार ५००, नगरमध्ये ५०० आणि पुण्यातील येरवडा कारागृहात ३ हजार ४० बंदीवानांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येईल. याशिवाय गोंदिया, वाशीम, हिंगोली, बारामतीसह जिथे कारागृहे नाहीत, त्याठिकाणी नवे कारागृह तयार करण्यावरही प्रशासनाचा भर आहे.
    कारागृह महिला शिपायाला पेटवण्याचा प्रयत्न, पुण्यात वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला अटक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *