गोराई परिसरातील तक्रारदार महिला एका सोसायटीत गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा आणि सूनबाई परदेशात कामासाठी असतात. तर त्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करून आपली गुजराण करतात.
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास कसलासा आवाज आल्याने त्यांनी झोपेतून उठून पाहिले तेव्हा २५ ते ३० वर्षांचा एक मुलगा तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून त्यांना दिसला. तू आत कसा शिरलास? कोण आहेस? असे त्यांनी विचारले. तेव्हा मी गर्दुल्ला आहे, चोरी करायला आलोय, असे उत्तर त्याने दिले. त्यानंतर तो महिलेच्या अंगावर धावून गेला. धक्काबुक्की करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत काहीतरी अशोभनीय वर्तन होईल याचा अंदाज त्यांना आला. तेव्हा त्यांनी भुरट्या चोरट्याला मी एड्स रुग्ण आहे, असे सांगितले.
संबंधित महिलेला तितक्यात रक्ताची उलटी झाली. ते पाहून चोरटा अधिकच सैरभेर झाला. घराच्या दरवाजातून बाहेर पडत बाहेरून कडी लावून त्याने तिथून धूम ठोकली. त्यानंतर तक्रारदार महिलेने शेजाऱ्यांना मोबाइलवरून घडलेली घटना कळवली आणि मदतीसाठी बोलावले. त्यानुसार शेजाऱ्यांनी महिलेच्या दाराला लावलेली कडी काढली. या सगळ्या प्रकारानंतर तक्रारदार महिला घाबरल्या होत्या. त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बोरीवली पोलिसात अनोळखी चोराच्या विरोधात तक्रार दिली आहे.
या प्रकरणात बोरीवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी बोलताना सांगितलं की, आम्ही याप्रकरणी अनोळखी चोराच्या विरोधात भादंवि ३२३, ३४१, ३८० आणि ५११ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच चोराचाही शोध सुरू आहे.