महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं म्हटल्यानंतर हे सगळेजण टुणकन भाजपाबरोबर गेले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरेंनी ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही, असं सुनावताना लोकसभेला एक आणि विधानसभेला दुसरी अशी भूमिका आम्ही घेतली नाही, अशी आठवणही मिटकरी यांनी करून दिली.
अमोल मिटकरी म्हणाले, “कोहिनूर प्रकरणात ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही आता सत्तापक्ष आहोत. लोकसभा निवडणुकीवेळी मोदी आणि भाजपाविरोधात आगपाखड करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोहिनूर प्रकरणात ईडी नोटीस पाठवते. मग त्यानंतर यूटर्न घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपली भूमिका कशी बदलली, हे महाराष्ट्राला ठावूक आहे. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या पक्षाचं पुढे काय झालं, हे देखील आपण पाहिलं. ते महाराष्ट्राच्या पटलावर कुठेही दिसत नाहीत”
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबद्दल राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमधील फडके नाट्यगृहात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर टिप्पणी केली. ‘मोदी यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे ते सांगतात. अरे, खोटे तरी बोलू नका,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘दुसऱ्याचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायला शिका,’ अशीही टीकाही त्यांनी भाजपला उद्देशून केली. ‘खोके खोके म्हणून दुसऱ्यांवर टीका करणाऱ्यांकडे तर कंटेनर आहेत. करोनाकाळही या लोकांनी सोडला नाही,’ अशी टीका त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केली.