मलनि:सारण विभागाच्या कार्यकक्षेत मुंबईत ७४ हजार, तर पर्जन्यजलवाहिनी विभागाच्या कार्यकक्षेत २५ हजारांहून अधिक मॅनहोल आहेत. मॅनहोलचे झाकण चोरीस गेल्यास थेट गुन्हा दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. नुकत्याच झालेल्या सुनावणीत उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने मॅनहोल झाकण्याची खबरदारी घेण्याची तातडी दाखवली. मात्र दीड वर्षात मॅनहोल उघडेच राहणे, त्यांची झाकणे चोरीस जाणे, झाकण खराब होणे किंवा तुटणे असे धोकादायक प्रकार घडल्याचे मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण विभागाच्या निदर्शनास आले आहे. मॅनहोलवर झाकण नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वॉर्डकडून किंवा स्थानिकांकडूनच तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे.
मलनि:सारण विभागांतर्गंत येणारे मॅनहोल हे बहुतांश उपनगरातच अधिक आहेत. जानेवारी ते डिसेंबर, २०२२मध्ये मॅनहोलसंदर्भात ८३६ तक्रारी समोर आल्या आहेत. तर जानेवारी ते जुलै, २०२३दरम्यान सुमारे ४०० घटनांची नोंद झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मलनि:सारण विभागांतर्गंत येणारे मॅनहोलची झाकणे चोरीस गेल्याचे ५०हून अधिक गुन्हे गेल्या सात महिन्यांत दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
वांद्रे पश्चिम, माहीम, माटुंगा, गोवंडी, मालाड मालवणी, मुलुंड पश्चिम आदी भागांत मॅनहोलची दुरवस्था दिसून येते. झाकण नसणे, उघड्या मॅनहोलमध्ये झाडाच्या फांद्या टाकलेल्या दिसतात. काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत. माटुंगा पश्चिमेला तुळशी पाइप रोड भागात ही संख्या अधिक आहे. यासंदर्भात आमच्या ‘ट्विटर’वर बऱ्याच तक्रारी येतात. मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाकडून महिन्यातून एकदा अशा मॅनहोलचा आढावा घेतला जावा. – मुश्ताक अन्सारी, संस्थापक, पॉटहोल्स वॉरिअर्स फाऊंडेशन
मालाड, गोरेगाव दिंडोशी भागातही मॅनहोलची दुरवस्था आहे. काहींवर झाकण नसते आणि झाकण जरी असले तरीही त्यांची बरीच दुरवस्था झालेली असते. दिंडोशी महापालिका वसाहतीतच असे मॅनहोल आढळतील. महापालिकेच्या पाहणीत वर्षभर सातत्य असावे- संदीप सावंत, सचिव, साद प्रतिसाद सामाजिक संस्था
पोलिसांचीही झाकणांवर नजर
लोखंडी आणि वजनदार झाकणांना भंगारात चांगला भाव मिळत असल्याने मॅनहोलच्या झाकणांची चोरी होते. झाकणे चोरण्यासाठी रिक्षा किंवा अन्य वाहनांचा वापर केला जातो. रात्रीच्या वेळी या चोरी होत असल्याने आता पोलिसांनी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून झाकणांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. झाकणे चोरीस गेल्यास स्थानिक कार्यलयातून प्रथम पोलिसांकडे तक्रार केली जाते. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास सुरू करतात. एमएचबी कॉलनी पोलिसांनी एक चोर आणि एक भंगारवाला अशा दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल २६ चोरीची झाकणे हस्तगत केली होती. गावदेवी, कुर्ला, वाकोला पोलिस ठाण्यांनीही गेल्या दोन-तीन महिन्यांत झाकणचोरांची धरपकड केली आहे.