• Mon. Nov 25th, 2024

    शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान यशस्वी करा – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 14, 2023
    शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान यशस्वी करा – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – महासंवाद

             अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील दिव्यांगासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ व समुपदेशन केले जाणार आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणानी समन्वय साधून जनजागृती करावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत व या संदर्भातील नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्याकडील शासकीय योजनांचे स्टॉल्स शिबिरामध्ये लावावे. लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावे. तसेच त्यांच्या गरजेनुसार त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. यासाठी प्रत्येक विभागाने दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसिध्दी करावी. अभियानाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी विविध माध्यामातून सर्व विभागानी जनजागृती करावी. तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष श्री. कडू यांनी दिले.

    दिव्यांगाच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण करणे, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी (UDID) कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, शिधा पत्रिका मधील इतर फेरफार व नवीन नाव समाविष्ट करणे, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी, उपलब्ध नोकरी आणि त्याचे स्वरूप याचा लाभ दिव्यांग बंधू-भगिनींना देण्यात यावा. यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढाकार घ्यावा. तसेच ग्रामीण आणि शहरी दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *