• Mon. Nov 25th, 2024

    आम्ही सरकारच्या तुकड्यांवर विसंबून नाही महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन, डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार

    आम्ही सरकारच्या तुकड्यांवर विसंबून नाही महेश एलकुंचवार यांचे प्रतिपादन, डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार

    म.टा.प्रतिनिधी, नागपूरखरीखुरी लोकशाही हवी असेल तर आपण सरकारवर अवलंबून राहणे सोडले पाहिजे. सरकारची आम्हाला गरज नाही असे आपण ताठ कण्याने सांगितले पाहिजे. सरकारच्या तुकड्यांवर आम्ही विसंबून नाही असे आपण ठणकावून सांगत नाही, तोपर्यंत आपला धाक निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले.

    अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग उपस्थित, वि.सा.संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. रवींद्र शोभणे, अरुणा शोभणे आणि साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी बोलताना एलकुंचवार यांनी मराठी शाळांच्या भवितव्याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. बहुतांश मराठी शाळा या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मराठी शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या शाळा वाचविण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. या शाळा एक दिवस पडतील आणि त्या जागा बिल्डर ताब्यात घेतील. जगभर इंग्रजीचे प्राबल्य आहे म्हणून पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत घालतात. मात्र, अशा शाळांमध्ये घालून पाल्याची वाढ खुंटते. अशा विद्यार्थ्यांचे पुढे काय होते याची कल्पना नाही. मराठी शाळा नष्ट करुन आपण गरिबांच्या विकासाच्या संधी नष्ट करीत आहोत. तळागाळातील लोकांचा आवाज कुणी ऐकत नाही. त्यामुळे, मध्यमवर्गीयांनीच यासाठी पुढे यावे आणि मराठी शाळा वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे एलकुंचवार म्हणाले.

    “ आपल्या उद्योगपतींनी शिक्षण आणि आरोग्यासाठी सर्वांना परवडतील अशा सुविधा निर्माण करून द्याव्या. पण, आपल्याकडे उद्योगपती मंदिरे होती. अंबानीसारखे लोक प्रचंड मोठाली घरे बांधतात. संपत्तीचे असे प्रदर्शन दाखविणे सुसंस्कृतता नाही. अध:पाताची मुळे कुठपर्यंत जातात माहिती नाही,” अशी खंतही एलकुंवार यांनी व्यक्त केली.

    दर महिन्याला व्हावी लहान संमेलने
    वर्षातून एकदा होणारे साहित्य संमेलन हा एक उत्सव असतो. अशा संमेलनांना मी जात नसलो तरी हे उत्सव व्हायला हवेत. यातून वाचकांना लेखकांशी संवाद साधता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात ग्रंथविक्री होते. मात्र, वर्षातून एकदा होणाऱ्या अशा उत्सवापेक्षा दर महिन्यात विशिष्ट ठिकाणी तीन ते चार लेखकांना बोलवून लहान संमेलन घ्यायला हवे. अशा संमेलनांना लागणारा खर्चही कमी असतो. शिवाय, त्यात विचारांचे अधिक गंभीर आदानप्रदान होऊ शकेल. मात्र, हे माझे मत आहे आणि लेखकाचे मत आता बिनमहत्वाचे होऊ लागले आहे. आपल्याला सोहळे अधिक महत्वाचे वाटतात, असे एलकुंचवार यावेळी म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed