१ ऑगस्टला सना खान जबलपूरला रवाना झाली होती. २ ऑगस्टला तिथे पोहोचल्यानंतर तिने आईला जबलपूरला पोहोचल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. पुन्हा फोन केल्यावर तिचा फोन बंद होता. आरोपी अमितही त्याच दिवसापासून बेपत्ता होता. यानंतर सनाच्या आईने मानकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेले आणि आरोपींच्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. मात्र आरोपी सापडला नाही. यावेळी पोलिसांनी आरोपी पप्पू साहूच्या ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरला अटक केली.
आरोपीने दिली हत्येची कबुली
या प्रकरणात पोलीसही सीमा वादाच्या भोवऱ्यात सापडले. आणि नागपूर पोलीस आणि जबलपूर पोलिसांची अनिर्णय वृत्तीही दिसून आली. मात्र प्रकरण चिघळल्याने एक दिवसआधीच नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेसह मानकापूर पोलिसांचे पथक आरोपी अमित उर्फ पप्पू साहूच्या शोधात जबलपूरला पोहोचले. रात्रभर शोध घेतल्यानंतर पोलिसांना यशही मिळाले. शुक्रवारी सकाळी पप्पू साहूला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले. महत्त्वाचं म्हणजे चौकशीदरम्यान त्याने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी यापूर्वी पोलिसांना पप्पू साहूच्या कारमध्ये रक्ताने माखलेले कपडे सापडले होते. याची माहिती देणाऱ्या त्याच्या एका नोकराला अटक केली होती. जबलपूर पोलिसांसह नागपूर पोलीस आता सना खानच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. चौकशीदरम्यान पप्पू साहूने या हत्या प्रकरणातील त्याच्या आणखी एका साथीदाराचे नाव सांगितले असून त्याचाही शोध सुरू आहे.
सीआयडी चौकशीची भाजपची मागणी
या प्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी नागपूर भाजपने केली आहे. याबाबत भाजप अल्पसंख्याक मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस जुनैद खान यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सना खान बेपत्ता होऊन ९ दिवस उलटून गेले तरी आतापर्यंत मध्य प्रदेश पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस तिला शोधू शकलेले नाहीत. आता हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
चार महिन्यांपूर्वीच आरोपीशी झाला होता विवाह
सना खानने चार महिन्यांपूर्वी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूशी लग्न केले होते. आरोपीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याचे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लग्न झाले होते. मात्र आरोपीच्या चुकीच्या कामामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्याला घटस्फोट दिला होता. त्याने या वर्षी एप्रिलमध्ये सनासोबत लग्न केले होते.