• Mon. Nov 25th, 2024

    सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2023
    सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. ११ (जिमाका) : सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या 6 महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरेाबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. पर्यावरणपुरक विकास हे तत्त्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. वाघमोडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थिती  होती.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बांबूपासून वेगवेगळे साहित्य, फर्निचर, इथेनॉल, अलंकार वस्तू बनवू शकतो, या सर्वांच्या निर्मितीतून बांबूपासून उत्पनाचे एक चांगले मॉडेल तयार होईल. कांदाटी खोऱ्यातील जमीन उंच सखल आहे.  या जमिनीचा वापर बांबू उत्पादनासाठी होऊ शकतो.  बांबूसाठी हेक्टरी 6 लाख 90 हजारापर्यंतची रक्कम शासन शेतक-यांना टप्याटप्याने देते.  चौथ्या वर्षी उत्पादन सुरु झाल्यावर एकरी एक लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकते.  शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे.  शेतकरी केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे.  त्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय आपण घेत आहोत.  या भागातील शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, सर्वसामान्य माणसाला नोकरीसाठी आपले गाव सोडून जावे लागू नये, त्याला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.

    यावेळी त्यांनी बांबूपासून अलंकार बनविण्या-या गुवाहाटी येथील नीरा शर्मा यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा झाली असून कांदाटी खो-यातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे सांगितले.

    यावेळी पाशा पटेल यांनी बांबू उत्पादन लागवड, शासनाचे अनुदान, बांबू निर्मितीपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन मुख्यमंत्री महोदयांनी बांबू मिशनअंतर्गत राबविण्यात येणा-या कार्यक्रमाला दिवसभरातला मोठा वेळ देणे, हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे सांगितले.   त्यांनी बांबूपासून बनिविण्यात आलेली खुर्ची, विठ्ठल   मुर्ती व अन्य बांबूपासून निर्मित वस्तू मुख्यमंत्री महोदयांना सादर केल्या.   बांबूचे उत्पादन घेणे शेतक-यांसाठी  किफायतशीर असल्याचे सांगत असताना भावी पिढीला शुध्द हवा, पाणी आपल्याला देता यावे, यासाठी बांबू लागवडीची आवश्यकता अधोरेखित केली.

    यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सातारा जिल्ह्यात येत्या दोन-तीन महिन्यात 10 हजार हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्ह्यात पर्यटन वृध्दीच्या दृष्टीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.  यामध्ये सातारा जिल्ह्याला लाभलेली नैसर्गिक विविधता, गड किल्ले, व्याघ्र प्रकल्प पक्षी अभयारण्ये , मंदीरे, ट्रेकींगची ठिकाणे, पुणे मुंबई याठिकाणी असलेली आंतरराष्ट्रीय विमानतळे या सर्वांचा पूरेपूर  वापर करुन पायाभूत सूविधांची गुणवत्ता वाढवून पर्यावरण पुरक पर्यटनाला चालना व त्यातून रोजगार निर्मिती यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

    या दौऱ्यात मेरी मिट्टी, मेरा देश या उपक्रमांतर्गत ग्रामंपचायत पिंपरी तांब येथे शिलाफलकाचे उदघाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *