• Sat. Sep 21st, 2024

वसतिगृह कधी सुरु होणार? मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थ्यांची नाराजी

वसतिगृह कधी सुरु होणार? मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थ्यांची नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षी उद्घाटन केलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे हे वसतिगृह कधी सुरू केले जाणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. तसेच विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठाने कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले आहे. त्याचे उद्घाटन जुलै, २०२२मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले हे नवीन वसतिगृह सहा मजली असून त्याची १४६ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

सध्या मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत आहेत. एक वर्षाच्या कालावधीनंतरही अद्याप हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. वसतिगृहाअभावी या विद्यार्थ्यांना कलिनापर्यंतचा प्रवास दूरवरून करावा लागत आहे. यातून विद्यार्थ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केली. तसेच विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

कुलगुरूंना पत्र

मुंबई विद्यापीठाने मुलांचे आंतरराष्ट्रीय वसतिगृह सुरू केले तर विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचेल. त्यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर वसतिगृह सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. अमोल मातेले यांनी कुलगुरूंना ई-मेलद्वारे केली आहे.
‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांची पाठराखण; विद्यापीठाकडून नावे जाहीर करण्यास नकार, काय कारण?
प्रक्रिया सुरू

विद्यापीठाकडे याबाबत विचारणा केली असता, विद्यापीठाचे वसतिगृह सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच वसतिगृह सुरू केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed