मुंबई, दि. ८ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक एल. के. वर्मा, भारतीय कंटेनर कार्पोरेशन लिमिटेडचे अरूंजय कुमार सिंह, महाप्रित कंपनीचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे, महात्मा फुले महामंडळ रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक के. व्ही. लोहकरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक संतोषकुमार झा म्हणाले, या बैठकीचा मुख्य उद्देश व्यवसाय मालकाच्या गरजा समजून घेणे व शीतगृह साखळी (कोल्ड स्टोरेज चेन) उभारणे, मालवाहतूक व लॉजिस्टिकचा विस्तार करून निर्यात वाढविणे हा आहे. तसेच रत्नागिरीच्या या कोल्ड स्टोरेजपासून जेएनपीटीपर्यंत रेल्वेद्वारे यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
याप्रसंगी तेजस शिंदे यांनी ‘महाप्रित’च्या शीतगृह प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या शीतगृह प्रकल्पामुळे कोकण विभागातील शेतकरी बांधवांना व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
या बैठकीला कोकण विभागातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
००००
शैलजा पाटील/विसंअ/