• Tue. Nov 26th, 2024

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

    ByMH LIVE NEWS

    Aug 8, 2023
    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

    मुंबई, दि. 8 : चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टील, कागद, सिमेंट, औष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायू, जल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर दर्जेदार कार्यपद्धती अमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात चंद्रपूर जिल्हा प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, सहसंचालक विद्यानंद मोटघरे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर मनपा आयुक्त श्री. पालीवाल, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.

    चंद्रपूर शहरातील रनाळा तलावाला प्रदूषणमूक्त करून सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, रनाळा तलावाचे सौंदर्यीकरण पूर्ण करावे. तसेच प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रम राबवावा. प्रदूषण दाखविणारा डिजिटल फलक शहरात प्रमुख चौकांमध्ये लावावा. प्रदूषण पातळीवरून नागरिकांनी कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावरील परिणामांबाबत जनजागृती करावी.

    मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, प्रदूषणाबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायदे, राष्ट्रीय हरीत लवादाचे निर्णय आदींबाबत छोट्या- छोट्या पुस्तिका तयार कराव्यात. नागरिकांना याबाबत जागरूक करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत. तसेच जिल्ह्यात खनिकर्म निधीमधून स्मशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पद्धत वापरण्यात यावी. यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे.

    प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक श्री. मोटघरे यांनी सादरीकरण केले. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत माहिती दिली. तसेच उपाययोजना सांगितल्या. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed