सावंत यांना आपल्या मूळ गावच्या वातावरणाची ओढ कायम होती. कोकणात फक्त मे महिन्यात आणि गणपतीला वर्षांनी यायचं. तेथेच शेतीपूरक व्यवसाय उभारावा, असे त्यांना कायम वाटायचे. अखेर सावंत परदेशातील नोकरी सोडून गावी परतले. त्यांनी गावी येऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केला. प्रथम सावंत यांनी व्यवसायातील प्रशिक्षण, शेळीपालकांकडे भेटी आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यावर भर दिला. पुणे, पंढरपूर, बारामती, सावंतवाडी आदी २५ हून अधिक ठिकाणी त्या निमित्ताने त्यांनी भेटी दिल्या. संगोपन व्यवस्थापनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतची बारकाईने माहिती घेतली. ४ वर्षात यशस्वीपणे शेळीपालन व्यवसाय सुरू आहे.
कोकणात येऊन विविध व्यवसायाची सुरुवातीला माहिती घेतली. सर्व व्यवसायाची माहिती घेतल्यानंतर शेळीपालन व्यवसाय करायचा ठरवलं. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये बंदिस्त शेळीपालन फारसे कोण करत नाही. सुरुवातीला देशी, उस्मानाबादी, सोजत, सिरोही, बीटल या जातींच्या शेळ्या आणल्या. पण काही शेळ्यांना येथील वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळे काही शेळया दगावल्या. त्यामुळे सावंत थोडेसे नाराज झाले. त्यांच्यासमोर आफ्रिकन बोअर जातीच्या शेळीपालनाचा पर्याय समोर आला. सावंत यांनी शेळीपालन करायला सुरुवात केली. त्या बोअर शेळ्यांची किंमत १ लाखांपासून ते १५ लाखांपर्यत आहे.
हा शेळीपालन फार्म १० गुंठ्यामध्ये साकारण्यात आला आहे. मूळ फार्म हा १०० फूट ते ३० फूटमध्ये उभा केला आहे. सध्या सावंत यांच्याकडे आफ्रिकन बोअर जवळपास १२७ शेळ्या आहेत. मात्र शेळ्यांच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. त्यातून सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी त्याचप्रमाणे सातारा ,कराड, संभाजीनगर या जिल्ह्यातील ग्राहक आहेत. ओडिशा, आसाम, चेन्नई बिहार या ठिकाणी सुद्धा आम्ही शेळ्या विकतो. ५० हजारांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत विकतो. वर्षभरात बोकडाचे वजन १०० ते १२० किलोपर्यंत होते. या शेळ्यांना खाद्य मका, खुराक, कोकणातला ओला चारा, सुखा चारा देतात.
त्याचप्रमाणे कोकणात नवीन शेळी पालन व्यवसायिक तयार करतो आहे. कोकणात शेळी पालनाला वाव द्यावा हा सुद्धा हेतू आमचा आहे. आतापर्यंत रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या भागामध्ये २३ शेळीपालक तयार केले आहेत. सावंत हे महिन्याला ५ लाखांपर्यत शेळ्या विकतात. शेळ्यांचा खाद्य खर्च, कामगावर पगार आणि इतर खर्च वगळून महिन्याला १.५० ते २ लाखांचा निव्वळ नफा होतो. त्यामुळे कोकणात तरुण युवकांनी अशा शेळीपालनाकडे वळायला काहीच हरकत नाही.