• Mon. Nov 25th, 2024

    नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार – पालकमंत्री संजय राठोड

    ByMH LIVE NEWS

    Aug 7, 2023
    नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार – पालकमंत्री संजय राठोड

    *शेतकऱ्यांना पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन करा

    *नुकसानीच्या पंचनाम्याबाबत तक्रारी येता कामा नये

    *महागाव तालुक्यात ९० टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण

    यवतमाळ, दि. ७(जिमाका) : अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती बाधित झाली आहे. या बाधित क्षेत्रातील शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करावे. पंचनाम्याबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लवकरच जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरिय समाधान शिबीर घेणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

    महागाव तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी तहसिल कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या आढावा सभेला महागावचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोले, तहसिलदार व्ही एल राणे, जिल्हा परिषदेचे उप अभियंता विवेक जोशी, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे, तालुका कृषी अधिकारी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातील तालुक्यातील पीक परिस्थिती, नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती घेतली. त्यावेळी महागाव तालुक्यात अंदाजे ३७ हजार ७६० हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून ३१ हजार १६० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी पंचनाम्यातून कोणीही सुटणार नाही, याविषयी तक्रारी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल १५ ॲागस्टपूर्वी शासनाला सादर करण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी. यासोबतच ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाड्या, रस्ते, पुल आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. राठोड यांनी प्रशासनाला दिले.

    शेतपिकांच्या संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

    अतिपावसामुळे बाधित क्षेत्रातील शेतीपिकांची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली आहेत. उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेतपिकांना कीड लागण्याचा धोका असून शेतीपिकांच्या संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. लोकांचे प्रश्न सोडविणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार आहे. या शिबिराला पालक सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तालुका प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

    यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रताप पंडागळे यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाचा धनादेश आणि अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकाचे वितरण पालकमंत्री  संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed