• Sat. Sep 21st, 2024

गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

ByMH LIVE NEWS

Aug 5, 2023
गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली,(जिमाका)दि.05:  गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या टोकावरील अतिदुर्गम जिल्हा असला, तरी शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री  धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.  शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे जिल्ह्यातील पूर परिस्थिती तसेच विविध विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

शासनाचे गडचिरोली जिल्ह्याला विशेष प्राधान्य आहे, असे सांगून श्री. आत्राम म्हणाले, जिल्हा पुढे गेला पाहिजे, त्या अनुषंगाने सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. येथील परिस्थिती तसेच दुर्गम भागात येणाऱ्या अडचणी असल्या तरी अधिकारी आणि कर्मचारी योग्यरित्या काम करत आहे. असेच काम पुढेही करत राहा. तसेच काम व्यवस्थित झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पावसाळ्यात जिल्ह्यात रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेताना ना. आत्राम म्हणाले, रस्त्यांचे झालेल्या नुकसानी माहिती तयार करुन तातडीने सादर करावी. तसेच बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.

नदीवर असलेल्या लहान लहान पुलाविषयी माहिती घेऊन पुल उंचीबाबत किती निधी लागेल, माहिती  देण्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तसेच नविन रस्त्यांच्या कामात अडचण निर्माण होत असेल तर अपल्याला अवगत करावे. वनविभाग यांच्या हरकती असल्यास वनमंत्र्यांशी बोलून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील रस्ते पावसाळयात खुप खराब झालेले असून त्याबाबत माहिती संकलित करुन किती निधी लागणार आहे, याची माहिती द्यावी, जेणेकरुन निधीची मागणी करता येईल. रस्त्यांच्या कामात भूसंपादनाची अडचण निर्माण होत असल्यास त्याबाबतही कळवावे.

यावेळी त्यांनी सिंचन विहिरी बाबत विचारणा करुन जिल्ह्यात निधी अभावी किती सिंचन विहिरी अपुर्ण आहेत, ही माहिती जाणून घेतली. व निधीबाबत पाठपुरावा करुन ते मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. पुरामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

तसेच यावेळी अपर जिल्हाधिकारी, धनाजी पाटील तसेच विविध विभागातील विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed