आळंदी येथे सुरुवातीला डोळे येण्याचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढला. त्याचबरोबर राज्यातही डोळ्यांची साथ प्रसरली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत औषधांच्या आणि ‘ड्रॉप’च्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तुटवडा जाणत असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
एका औषध विक्रेत्याने सांगितले की, ‘डोळ्यांच्या आजाराबरोबरच सध्या ताप, सर्दी, खोकला आणि ‘फ्लू’चे रुग्ण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून कंपन्यांकडून ड्रॉपचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवडा असलेल्या ड्रॉपचा साठा डॉक्टरांनी करून ठेऊ नये, असे केमिस्ट असोसिएशनचे म्हणणे आहे.’
अन्न व औषध प्रशासनाचे (औषधे) सह-आयुक्त श्याम प्रतापवार म्हणाले, की ‘सध्या आय ड्रॉपचा तुटवडा असल्याची तक्रार आलेली नाही. तुटवडा निर्माण झाला, तर अन्य विभागांमधून ड्रॉपचा पुरवठा केला जाईल.’
लक्षणे काय आहेत
डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
घरगुती उपचार कसे करावेत?
-सुरुवातीला लक्षणे दिसताच घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याने स्वच्छ कापूस ओला करून डोळे पुसावे. डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं.
-कापूर जाळून धूरी करू शकता यामुळे डोळ्यातील घाण अश्रूंवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
-एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडतो
शहरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये डोळ्यांची साथ वाढली आहे. सध्या देशभरात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक मागणी वाढल्याने ड्रॉपचा तुटवडा जाणवत आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण लवकर बरे होत आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दोन ते तीन आठवड्यात साथ कमी होईल, असा अंदाज आहे.
– डॉ. मंदार परांजपे, अध्यक्ष, पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना
सध्या डोळे येण्याचे प्रमाण वाढले असल्याने ड्रॉप आणि औषधांची मागणी वाढली आहे. गरज असलेल्या औषधांचा आणि ड्रॉपचा साठा डॉक्टर स्वत:कडे करून ठेवत असतात. तुटवडा असलेल्या ड्रॉपऐवजी त्याचप्रकारचे दुसऱ्या कंपनीचे ड्रॉप घेता येऊ शकतात. सध्या पाच दिवसांत रुग्ण बरे होत आहे.
– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा
शहरात डोळ्यांची साथ सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप’चा तुटवडा जाणवत आहे. रुग्ण वाढत असताना आय ड्रॉप गेले कुठे? याचा शोध प्रशासनाने घेतला पाहिजे. तुटवडा असल्याने रुग्णांना ड्रॉप घेण्यासाठी फिरावे लागत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सहकार्य करावे.
– अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट