गुरुवारी रात्री अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या मसळे यांच्या घरात शिरला. कोणाला काही कळायच्या आत तो टीव्हीच्या टेबलाखाली लपून बसला. दरम्यान, घरात सर्व जण झोपले होते. रात्रभर बिबट्याही तेथेच होता. सकाळी दूध काढण्यासाठी घरातील माणसे उठल्यावर त्यांना टीव्हीच्या खाली बिबट्याचे शेपूट दिसले. सुरुवातीला त्यांना साप असल्याचा भास झाला. यामुळे त्यांनी काठीने शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर बिबट्या दिसताच सर्वांचीच तारांबळ उडाली. घरात रामचंद्र मसळे यांची पत्नी सुगंधा, आई जिजाबाई यांनी प्रसंगावधान दाखवून घराबाहेर धाव घेतली. तोपर्यंत ही खबर गावभर पसरली. नागरिकांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली.
यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्या घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. तो पावसात भिजल्याने व त्याला काही ठिकाणी जखमी झाल्याने तो आजारी होता; तसेच घाबरल्यामुळे तो लवकर घरातून बाहेर निघत नव्हता. यामुळे वन विभागाने त्याला पकडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन बेशुद्ध केले. यानंतर पाच ते सहा वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या ताब्यात घेण्यात आला. या वेळी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, माणिकडोह बिबट निवारा केद्रांचे चंदण सवाने, महेंद्र ढोरे, वनपाल प्रवीण लांघी आदी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
म्हाळुंगे तर्फे आंबेगाव परिसरात भातलावणीची कामे सुरू आहेत. सकाळी लवकर शेतात गेलेली माणसे संध्याकाळीच घरी येतात. यादरम्यान घरात केवळ लहान मुले आणि एखाद दुसरी वृद्ध व्यक्तीच असते. या भागात अलीकडच्या काळात वारंवार बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे अवतीभोवती जंगलही मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेकदा दोन-दोन दिवस विजही नसते. त्यातच आता बिबट्याने थेट घरात ठाण मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आदिवासी भागातील घरात बिबट्या शिरला होता. यामुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात मोबाइलला रेंज नसल्याने संपर्क होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. बिबट्या जखमी व आजारी असल्यामुळे त्याला घरातून काढणे आवघड झाले होते; परंतु रेस्क्यू टीममुळे व स्थानिकांच्या सहकार्याने बिबट्याला पकडून जेरबंद करण्यात आले. बिबट्या आजारी असल्याने त्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
– एम. बी. गारगोटे, वन परिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव