• Sat. Nov 16th, 2024

    सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार  

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2023
    सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार  

               अनुसूचित  जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, दिव्यांग कल्याण व समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था आणि उल्लेखनीय काम करणारे समाजसेवक यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

                डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार देण्यात येतात. त्याविषयीची माहिती…

     

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व संत रविदास पुरस्कारासाठी व्यक्तींसाठी वयाची अट पुरुषांसाठी किमान 50 व महिलांसाठी किमान 40 वर्षे आहे.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

    या पुरस्काराचे 51 व्यक्तींना 15 हजार रुपये तर 10 संस्थेला 25 हजार रुपये याप्रमाणे स्वरुप आहे. ही रक्कम धनाकर्षाद्वारे दिली जाते. व्यक्तींनी सामाजिक क्षेत्रात 10 वर्षे वैयक्तीक अभिजात कार्य केलेले असावे. तसेच संस्थांचे या क्षेत्रात 10 वर्षाहून अधिक उल्लेखनीय कार्य आवश्यक आहे. संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. मागील 5 वर्षातील लेखा परिक्षण अहवाल आवश्यक आहेत.

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

    या पुरस्कारासाठी मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रातील काम पाहून निवड करण्यात येते. व्यक्ती किंवा संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही. 30 टक्के महिलांना पुरस्कार देण्यात येईल. 25 व्यक्तींना 25 हजार रुपये व 6 संस्थांना 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

    पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार

    नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रुढी निर्मूलन, जनजागृती, भूमीहिन शेतमजूरांचे कल्याण या क्षेत्रात काम करणारी एक संस्था व एक व्यक्ती या पुरस्कारासाठी निवडली जाते. व्यक्तीला 21 हजार एक रुपये व संस्थेला 30 हजार एक रुपये धनाकर्षाद्वारे दिले जातात.  व्यक्तींनी किमान 15 वर्षे व संस्थांनी किमान 10 वर्षे या क्षेत्रात काम केलेले असावे. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टींचा विचार केला जाणार नाही.

    संत रविदास पुरस्कार

    चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. एक व्यक्ती व एक संस्था या पुरस्कारासाठी निवडली जाते. व्यक्तीला 21 हजार एक रुपये व संस्थेला 30 हजार एक रुपये धनाकर्षाद्वारे दिले जातात.  एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.

    शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन संस्था याप्रमाणे राज्यातील 12 संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. 7 लाख 50 हजार रुपयाचा धनाकर्ष, सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार राज्यस्तरावर 3 व 6 महसूल विभागातील प्रत्येकी 3 याप्रमाणे 18 संस्थांना पुरस्कार देण्यात येतो.  राज्यस्तरावरील प्रथम 5 लाख, द्वितीय 3 लाख व तृतीय 2 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर विभागीय पुरस्कार प्रत्येक प्रवर्गामधून उत्कृष्ठ ठरलेल्या संस्थेस 1 लाख रुपये देण्यात येतो. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणारी संस्था पुन्हा 5 वर्षापर्यंत पात्र असणार नाही. ज्या संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

    इच्छूक स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या http://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    000

                                                                                                        गीतांजली अवचट,

                                                                                                         उपसंपादक

                                                                                                         विभागीय माहिती कार्यालय,पुणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed