पुणे मेट्रोच्या दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला लोको पायलट आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन या मुली इथपर्यंत आलेल्या आहेत. साताऱ्याहून आलेली अपूर्वा प्रमोद आलटकर महिला पायलट असून यापूर्वी त्यांनी भारत फोर्जमध्ये नोकरी केलेली आहे. २४ फेब्रुवारी २०२३ त्यांची निवड पुणे मेट्रोचा पायलट म्हणून झाली. दहावीपर्यंत शिक्षण सातारा झाल्यानंतर मेकॅनिकल डिप्लोमा सोलापूरमध्ये केला. त्यानंतर इंजीनियरिंगची पदवीही घेतली. त्यानंतर मेट्रोमध्ये रुजू झाल्या. मेट्रो चालवतानाचा एक वेगळा अनुभव आहे.
आपलं सर्वत्र कौतुक होतं याचाही खूप मोठा अभिमान आहे. आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद होत आहे. ज्यांना मी ओळखत नाही त्या लोकांनी सुद्धा माझा स्टेटस ठेवून माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं लोकांच्या प्रतिक्रिया ही खूप छान आहेत. एक महिला म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया अपूर्वा अलाटकर यांनी दिली आहे. तर पुण्यातील चाकण भागात राहत असलेली शर्मीन अय्याज शेख या देखील पुणे मेट्रोच्या लोको पायलट आहेत. कुठलीही गाडी चालवता येत नसलेली मी आज मेट्रो चालवत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. सुरुवातीला खूप भीती वाटली. परंतु ज्या वेळेस मी एवढे प्रवासी घेऊन मेट्रो चालवत आहे. हे पाहिलं त्यावेळेस वाटलं, आपण धाडस केलं आणि आपण यशस्वी झालो. खूप अभिमान स्वतःवरच वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शर्मीन शेख यांनी दिलेली आहे.
तर नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या छोट्याशा खेड्यातून आलेली पल्लवी शेळके ही सावित्रीची लेक आता गतिमान पुण्याची स्टेरिंग हाती घेत आहे. संगमनेर येथील इंजीनियरिंग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर त्याने फॉर्म भरला. पल्लवी शेळके यांना पहिल्यापासून ड्रायव्हिंग करायची आवड होती. त्यात आणखी एखादी ड्रायव्हिंगची आवड म्हणून मेट्रोची निवड केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी प्रथमच मेट्रो चालवली. प्रथम चालवत असताना मनात एक भीती होती. की हे आपल्याकडून होईल का नाही कारण एवढे प्रवासी घेऊन आपण जाणार आहोत. माझे वडील शिक्षक असून ते पुण्यात आले नाहीत. पण आई पुण्यामध्ये आली होती. तिने मला मेट्रो चालवताना पाहिलं आणि आईच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद होता. ती सांगत होती की खूप लोक तुझ्याबद्दल अभिमानाच्या गोष्टी बोलतात. अभिमान व्यक्त करतात, त्यामुळे खूप अभिमान स्वतःचाही वाटत असल्याचे पल्लवी शेळके यांनी म्हटलेलं आहे.
शैक्षणिक माहेरघर असलेल्या पुणे शहराला स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री चळवळीचा मोठा वारसा आहे. पेठांच्या शहरात स्त्रियांना शिक्षण देणारे पुणे अशी ओळख महाराष्ट्राला होती. हेच पुणे आता आधुनिक होत आहे. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. तसेच पुण्यात आता मेट्रो रेल्वे जाळ तयार झालेला आहे. त्यामुळे शहराचे स्वरूप बदलताना स्त्री शक्तीच्या जाज्वल्य इतिहासाचा पिंड मात्र तोच ठेवून हे शहर पुढे चालत असल्याचे दिसत आहे.