सोनाली संदेश चांदिवडे (२६), प्रणव संदेश चांदिवडे (६) या दोघांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यशवंत केडगे, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तात्काळ फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली संदेश चांदिवडे हि दि. १९ जुलै २०२३ रोजी लांजा डाफळेवाडी येथून तिचा पती संदेश चांदिवडे याला काही न सांगता निघुन गेली होती. ती दि. २९ जुलै २०२३ रोजी ती सापडली. ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ६.४५ वा. संशयित संदेश रघुनाथ चांदिवडे याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आपली पत्नी सोनाली संदेश चांदिवडे हिच्या मानेवर हत्याराने वार करुन हत्या केली.
याचवेळी मुलगा प्रणव संदेश चांदिवडे याचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चिमुकल्या प्रणवची गळा आवळून किंवा नाक तोंड दाबून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. फिर्यादी यांनी संदेश रघुनाथ चांदिवडे याच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून या दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा जाहीर रिपोर्ट मा. हुजुर कोर्टात सादर केला. तसेच वरिष्ठांना बिनतारी संदेशान्वये कळविण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटकडे हे करीत आहेत. ह्या हत्याकांडामुळे अवघ्या कोकणात खळबळ माजली असून संशयित फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आपल्या टीम रवाना केल्या आहेत. दरम्यान ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे. त्याने केलेल्या या निर्गुण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.