• Sun. Sep 22nd, 2024

पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या तरुणीची हत्या, मिटकरींचा आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या तरुणीची हत्या, मिटकरींचा आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अकोला : गळा अन् हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. किरण अर्जुन बळकर (वय १९ वर्षे, राहणार शिर्ला फाटा खदान, ता. पातुर, जि. अकोला) असे मृत तरुणीचे नाव आहे. किरण ही २७ जुलैपासून बेपत्ता होती. आणि २९ जुलैला तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पातुर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अकोला हादरलं! तरुणी अचानक घरातून बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, आता धक्कादायक बातमी आली समोर
आता किरण हिची हत्या करण्यात आली असून ती पातुर पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षणामुळे झाल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. तरुणी बेपत्ता असताना पोलिसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना सहकार्य मिळालं नाही. या आधीही तीन वेळा आरोपीविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्यांनं दखल घेतली नाही. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणाची किरण बळी ठरली, असा आरोप मिटकरींनी केला आहे.
कुख्यात गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश; पोलिसांनी भर बाजारात काढली होती धिंड, कोण आहे अज्जू ठाकूर?
पातुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शेगोकार हे पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी उद्धटपणाने वागले. कुटुंबीयांनी शेगोकारकडे विनवणी केली. तुमच्या मुलीला लांडगा किंवा हत्तीने उचलून नेले असावे, अशा भाषेत उद्धटपणाने उत्तर कुटुंबीयांना पोलिसांकडून मिळाले. यावेळी कुटुंबीयांकडून गजानन बळकर याच्यावर संशय व्यक्त केला होता. हा व्यक्ती असा करू शकत नाही, असे त्यावर शेगोकार म्हणाले. आता याबाबत चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. या आधी पातुर पोलिसांकडे तीन वेळा तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळेच आज किरणची हत्या झालेली आहे. आता अटकेत असलेल्या आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सखोल तपास करण्यात यावा. यामध्ये आणखी आरोपी सहभागी आहेत का? याचाही तपास करावा. या प्रकरणात विशेष खटला चढवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच सबंधित पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मिटकरींनी केली. आरोपीचा हेतू चांगला नव्हता, यामध्ये आणखीही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असेही मिटरी म्हणाले.

अकोल्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल; पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, याचा सखोल तपास केला जाईल. चौकशी दरम्यान पोलीस कर्मचारी शेगोकार यांनी असे उद्गार काढले असणार तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. पूर्वी तीन वेळा तक्रार करूनही पातुर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसेल तर त्या पोलिसांवरही कारवाई केली जाईल. या संपूर्ण प्रकरणात विशेष सरकारी वकील दिला जाईल आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीही दिली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

काय होतं नेमकं प्रकरण?

किरण अर्जुन बळकर (वय १९ राहणार शिर्ला फाटा खदान, ता. पातुर, जि. अकोला) ही २७ जुलैच्या रात्री शौचालयाला जाते म्हणून घरून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. परिसरात तिचा शोध घेण्यात आला. मात्र कुटुंबीयांना तिचा कुठलाही सुगावा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी ती बेपत्ता असलेली तक्रार पातुर पोलिसात केली. परंतु २९ जुलैला पातुर येथील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात किरणचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके एसडीपीओ गोकुळ राजसह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी किरण बळकर या तरुणीचा हात आणि गळा ओढणीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. आधी गळा आवळला नंतर तिचे हात बांधण्यात आले. आता वैद्यकीय अहवालानंतरच सर्व बाबी स्पष्ट होईल, असेही पोलीस सांगतात. दरम्यान किरणच्या मृत्यूच्या घटनेचे जिल्हाभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली. ठिकठिकाणी सामाजिक संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

किरणच्या हत्या प्रकरणात एकाला अटक

आरोपी गजानन बळकर याचे किरणच्या कुटुंबीयांसोबत वाद असल्याचे समोर आले. सद्यस्थितीत पोलिसांना गजानन याच्यावर संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तरी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता अकोला पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेतलं आहे. किरणच्या हत्ये मागील नेमकं कारण काय? या सर्व गोष्टींचा तपासही पातुर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed