तुमचे वडील शेतकरी. साहजिकच तुम्हीही त्यांच्याबरोबर शेतीत राबायला सुरुवात केली. मग काळ्या मातीने भरलेले हात अचानक काव्यलेखनाकडे कसे वळले?
माझा जन्म औरंगाबाद व जळगावच्या सीमारेषेवर असलेल्या ५०० लोकवस्तीच्या पळसखेडचा. एका गरीब शेतकरी कुटुंबात मी जन्मलो. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबायचे. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी मी पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झालो. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी माझी ओळख झाली. तेथील शिक्षकांनीच मला कवितेची गोडी लावली. साहित्यावर प्रेम करणाऱ्या या शिक्षकांच्या घरी मी कामही करत असे आणि तेथे पुस्तक वाचत असे. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर मी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झालो. तिथे साहित्यिक असलेल्या प्राध्यापकांकडून मला भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून मी गावी गेलो. वडिलांनी पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी त्यांना माझी गरज होती. शेतीमुळे माझं महाविद्यालयीन शिक्षण थांबलं, पण लोकशिक्षण मात्र सुरु झालं. या काळात मी दिवसभर शेतीचं काम करत असे आणि रात्री झोपडीत कंदील लावून पुस्तक वाचत असे. याच काळात मी ५०० हून अधिक पुस्तकं कंदिलाच्या प्रकाशात वाचली. त्यातून कवी-कथा-कादंबरीकार मला कळत गेले आणि त्यातून औरंगाबाद-जळगावला येणाऱ्या साहित्यिकांना भेटणं, त्यांना पत्र पाठवणं असा व्यवहार सुरू झाला. यातूनच मी पुढे साहित्याकडे वळलो…
कविता आणि इतर गद्यलेखनात रमलेले असताना मग चित्रपटातील गाण्यांकडे कसे वळलात?
– रानातल्या कविता सर्वत्र गाजत असतानाच एके दिवशी मंगेशकर कुटुबियांकडून त्यांची निर्मिती असलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील गाणी लिहिण्याचा प्रस्ताव आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल करणार होते, तर मोहन आगाशे, स्मिता पाटील असे मोठे कलाकार त्यात काम करणार होते. सिनेमाचं संगीत हृदयनाथ मंगेशकर देणार होते आणि अर्थातच गाणी लता मंगेशकर गाणार होत्या. हृदयनाथ आणि लताबाईंनी हा चित्रपट संगीतमय करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी त्यांनी तब्बल १६ गाणी हवी होती. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली होती. पण या दिग्गजांची नावं पाहूनच, हे आपल्याला जमणार नाही, असं सांगून मी त्यांना नम्रपणे नकार कळवला. हृदयनाथ आणि लताबाई आपल्या म्हणण्यावर ठाम होत्या. त्यांनी त्यांच्या घरी ‘प्रभुकुंज’मध्ये तीन दिवस मला कोंडून ठेवलं. त्या जबाबदारीच्या भानातून मी तब्बल १६ गाणी लिहिली, जी पुढे खूप गाजली. त्यानंतर ‘एक होता विदूषक’, ‘सर्जा’ यासह तब्बल ११ चित्रपटांसाठी मी गाणी लिहिली.