• Mon. Nov 25th, 2024

    झुल्फिकार बडोदावालाकडूनही दहशतवाद्यांना मिळत होते पैसे; ११ ऑगस्टपर्यंत सुनावली ‘ATS’ कोठडी

    झुल्फिकार बडोदावालाकडूनही दहशतवाद्यांना मिळत होते पैसे; ११ ऑगस्टपर्यंत सुनावली ‘ATS’ कोठडी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोथरूडमध्ये नाकाबंदीदरम्यान अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेला झुल्फिकार बडोदावालादेखील दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता; तसेच त्याचा संबंधित दोन्ही दहशतवाद्यांशी संपर्क असल्याचे राज्य दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून समोर आले आहे. बडोदावाला याला बुधवारी सकाळी न्यायालयासमोर सादर केले असता, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    ‘एसटीएस’ने दहशतवाद्यांना पैसे पाठविणाऱ्या निसाब नसरुद्दीन काझी याला नुकतीच अटक केली आहे. त्यापाठोपाठ बडोदावालावर कारवार्इ केली असून, आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बडोदावाला यास या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली? त्याने नेमकी किती रक्कम दहशतवाद्यांना दिली? या सर्वांचा तपास करण्यासाठी त्याला एटीएस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी बडोदावाला याला ११ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

    बडोदावाला याने महंमद इम्रान महंमद युसूफ खान आणि महंमद युसूफ महंमद याकूब साकी या दोघांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेळोवेळी फोनवरून संपर्कदेखील साधला असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन दहशतवाद्यांसह या गुन्ह्यात अटक केलेले चारही दहशतवादी पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed