वाखरी शाळा झालीच पाहिजे, आमची शाळा मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत जिल्हा परिषदेचा परिसर शाळेच्या विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांना त्यांच्या केबीनमध्ये शिष्टमंडळ भेटले होते. त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर ते जेवण करण्यासाठी जात असताना प्रवेशद्वारात मुलांच्या घोषणा ऐकून ते थांबले. त्यांनी ग्रामस्थांना विचारणा केली. ग्रामस्थांनी शाळेची दुरावस्था झाली आहे. शाळेला जागा नाही. वनविभागाची जागा असल्याने त्या जागेत शाळा भरवू नका, असे वनविभाग म्हणते आहे. तर संस्थाचालक बेडके यांचे राजकीय संबंध असल्याने त्यांच्याकडून ग्रामस्थांच्यावरच दबाव आणला जात आहे.
खिलारी यांनी ग्रामस्थांना समजून सांगत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. १९६२ साली लोकवर्गणी आणि श्रमदानातून वाखरी (ता. फलटण) येथील ग्रामस्थांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीमार्फत शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी या संस्थेला ही दगडी इमारत दिली होती. सध्या या इमारतीची दुरवस्था झाली असून या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना स्वच्छतागृह शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शाळेच्या इमारतीची अवस्था धोकादायक झालेली आहे. शाळेत शिक्षण घेताना गरीब आणि कष्टकरी विद्यार्थ्यांना नाईलाजाने धोकादायक इमारत असलेल्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. या संदर्भातही शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. परंतु याबाबत अद्यापही शाळेच्या सुविधाबाबत सुधारणा झालेली नाही.
इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग गावातील सार्वजनिक मंदिर, समाज मंदिर आणि पडझडीला आलेल्या शाळमध्ये विद्यार्थी बसवले जातात. प्रयोगशाळा, खेळाचे साहित्य, संगणक, ग्रंथालय याची सुविधा नसल्याने पालकांनी स्वातंत्र्य दिनी दि. १५ ऑगस्ट रोजी शिक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थाचालकांनी या इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळ्यात जर पावसाचे प्रमाण वाढले, तर या इमारतीला धोका होऊ शकतो. त्यापूर्वीच या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी केलेली आहे. या वेळेला वाखरी गावचे प्रथम नागरिक सरपंच शुभांगी शिंदे, सदस्य योगिनी गायकवाड, कुंदा बनकर, रंजना निंबाळकर, विजय काकडे, जगन्नाथ जाधव, सचिन ढेकळे यासह पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.