काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मुखेड तालुक्यातील सकनूर येथील रहिवासी असलेले संभाजी पुंडलिक नागरवाड (वय २१ ), शिवाजी रामदास सुरुमवाड (वय २०), संजय मारुती नगरवाड (वय २२) आणि विजय संभाजी हंबीरे (वय २२) हे चारही मित्र खेकडे पकडण्यासाठी गावातील ओढ्याकडे जात होते. एका शेतातून जात असताना शेतातील विद्युत तारेच्या कुंपणाला त्यांचा स्पर्श झाला.
विद्युत तारेचा शॉक लागल्याने संभाजी नागरवाड आणि शिवाजी सुरुमवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय मारुती नगरवाड आणि विजय संभाजी हंबीरे हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. शॉक लागल्यानंतर जखमी युवक दूर फेकले गेले होते. त्यांना विद्युत तार न दिसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर जखमींना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सकनूर गावात हळहळ व्यक्त होतं आहे.
रानडुक्करांसाठी शेतात विद्युत तारांचे कुंपण
जिल्ह्यात काही ठिकाणी दुबार पेरणी करून कोवळ्या पिकांना जगवण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच वन्य प्राणी हरीण, रोही, रानडुक्कर हे कोवळी पिके खाऊन नासाडी करत आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या शेतात विद्युत तारे कुंपण लावले असून रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाह सोडला जातो. मात्र या तारेला तरुणांचा स्पर्श झाला आणि दुर्घटना घडली.