या मोठ्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर जवळपास ३५ मुलांवर मोठं संकट उभं राहिलं होतं. पण त्याला नातेवाईक, प्रशासन सामाजिक संस्था यांनी आधार दिला. इतकेच नव्हे तर विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम ताई गोरे यांनी खुद्द त्या ठिकाणी भेट घेऊन त्या मुलांना विश्वास दिला.
त्यामुळे गेले काही दिवस वाडीत या मुलांचे खेळणे बागडणे ऐकू येत नसल्याने मोठा गंभीर प्रसंग होता. लहान असलेल्या या मुलांचे वय हे खेळण्याबागडण्याचं आहे. मात्र ही मुलं यातून बाहेर पडावी, त्यांना मानसिक आधार द्यावा यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून या मुलांची सगळी जबाबदारी घेतली आहे.
या दुर्घटनेनंतर जवळपास ४३ कुटुंबांचं स्थलांतर करून चौक येथे सगळी व्यवस्था करून त्यांच्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्या कुटुंबांची व्यवस्था एकत्रित केल्याने तेथे एक छोटी कॉलनीच उभी राहिली आहे. आता या सगळ्यावर स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे व त्यांना कोणत्याही मूलभूत आवश्यक व्यवस्थेची कमी होऊ नये याकडेही लक्ष देत आहेत.