काय आहे प्रकरण?
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२९ जुलै) सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान मंगला लक्ष्मण गायकवाड (वय ३७, रा .रामनगर, मुकुंदवाडी) या पोलिस आयुक्तालया समोर आल्या होत्या. या महिलेची अवस्था वाईट होती. पोलिसांनी तिची विचारणा केली असता, रामनगर भागातील काही लोकांच्या त्रासामुळे तिने फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणारे फिनेल प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी माहिती दिली. सदर महिलेने रामनगर भागातील एकाकडून लॉकडाउनच्या काळात पैसे घेतले होते. या महिलेने हे पैसे फेडले. मात्र, पैसे देणाऱ्या व्यक्तींकडून पैशांची पुन्हा मागणी करण्यात आली. सदर प्रकरण जूनमध्ये पोलिसासमोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढली होती.
शनिवारी सकाळी पुन्हा हातउसने पैसे देणाऱ्या कुटुंबातील काही जण महिलेच्या घरी पैसे मागण्यासाठी आले. एकदा पैसे पूर्ण दिल्यानंतर वारंवार पैशांचा तगादा लावून त्रास देत असल्याच्या रागापोटी तिने विषारी औषध घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचेही तावरे यांनी स्पष्ट केले.