उदगीर शहरातील चौबारा रोडवरील आंबेसंगे गल्लीमधील २७ वर्षीय तरुण शिवकुमार महादेव आंबेसंगे हा तरुण सध्या विजय कॉलनी शिवाजी विद्यालयाजवळ एका अपार्टमेंटमध्ये राहतो. सन २०१७ मध्ये उदगीर नगरपरिषद कॉम्प्लेक्स इथे “व्हीआयपी कम्युनिकेशन” नावाचे दुकान सुरू केले होते. त्या दरम्यान मोबाईल टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली. यातून सदर विक्रेत्यांने ग्राहकांकडून मिळालेला आधारकार्ड आणि फोटोंचा गैरवापर करत एकाच्याच नावे अनेक सिमकार्डची विक्री दाखवत कंपन्यांची फसवणूक केली.
शिवाय बनावट कागदपत्राने ऍक्टिव्हेट केलेले सिमकार्ड अनोळखी व्यक्तींना ज्यादा पैशात विक्री करुन त्याचा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर होऊ शकतो, याची जाणीव असताना सुद्धा असे सिमकार्ड विक्री करून कंपनीचे आर्थिक नुकसान व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दहशतवाद विरोधी शाखा, लातूर येथील पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून शिवकुमार महादेव आंबेसंगे याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक फौजदार उत्तम जाधव, अंगद कोतवाड, पोलीस अमलदार युसुफ शेख, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी केली आहे.