• Fri. Nov 15th, 2024

    जाणून घ्या ‘फॅटी लिव्हर डिसीज’ची सामान्य कारणं; आयुष्यभर त्रास होणार नाही, वाचा सविस्तर…

    जाणून घ्या ‘फॅटी लिव्हर डिसीज’ची सामान्य कारणं; आयुष्यभर त्रास होणार नाही, वाचा सविस्तर…

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पूर्वी मद्यपान आणि कावीळ ‘ब’ व ‘क’च्या संसर्गामुळे ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ म्हणजेच यकृत निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते; परंतु आता जंक फुड, स्थुलत्व व मधुमेहामुळे ‘नॉक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’चे (एनएएफएलडी) प्रमाण खूप जास्त वाढले आहे आणि अलीकडे यकृत निकामी होण्यात ‘एनएएफएलडी’ हे एक महत्वाचे कारण ठरत आहे. याच गतीने ‘एनएएफएलडी’चे प्रमाण वाढत गेले तर पुढील दशकापर्यंत भारत हा मधुमेह व स्थुलत्वाच्या राजधानीप्रमाणेच ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’चीही राजधानी होईल, अशी भीती यकृत व पोटविकारतज्ज्ञांनी शुक्रवारी (२८ जुलै) पाळण्यात येणाऱ्या जागतिक कावीळ दिनानिमित्त व्यक्त केली आहे.

    दरवर्षी काविळीशी संबंधित आजारांनी दहा लाख व्यक्तींचा मृत्यू होतो आणि त्यातही काविळीचे ‘ब’, ‘क’ व ‘ड’ हे विषाणुंचे प्रकार घातक मानले जातात. केवळ ‘ब’ व ‘क’मुळे रोज आठ हजार नवीन संसर्ग होतात. जवळपास प्रत्येक दहा सेकंदाला एक संसर्ग होतो आणि यकृत निकामी होण्यात हे संसर्ग खूप जास्त कारणीभूत ठरू शकतात, याकडे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे. त्यामुळेच गुरुवारी (२८ जुलै) पाळण्यात येणाऱ्या जागतिक कावीळ दिनाची यंदा ‘वन लाईफ, वन लिव्हर’ ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. भारताची स्थिती आणखी वेगळी आहे, याकडे लक्ष वेधताना शहरातील यकृत व पोटविकारतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध गोपनपल्लीकर म्हणाले, पूर्वी भारतामध्ये मद्यसेवनाच्या महत्वाच्या कारणासह कावीळ ‘ब’ व क’च्या संसर्गामुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र अलीकडे ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’मुळे (एनएएफएलडी) यकृत निकामी होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. आणखी महत्वाचे म्हणजे ‘एनएएफएलडी’साठी बदललेली जीवनशैली व खाद्यशैली खूप जास्त कारणीभूत ठरत आहे. तेलकट, तुपकट व अतिमसालेदार जंक फुड, फास्ट फुडचे सेवन वाढलेलेच आहेच; शिवाय हॉटेलिंगचेही प्रमाणही खूप जास्त वाढले आहे. त्याचवेळी मैदानी खेळ, व्यायाम व शारीरिक श्रम तसेच हालचालीदेखील खूप कमी झाल्या आहेत. त्यामुळेच वजन वाढणे, पोटाभोवती चरबी जमा होणे (सेंट्रल ओबेसिटी) व पर्यायाने स्थुलत्वाची समस्या आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. याच स्थुलत्वामुळे ‘फॅटी लिव्हर’ची समस्या उद्भवते.

    दहा वर्षांनी ‘सिऱ्हॉसिस’ धोका

    ‘फॅटी लिव्हर’ची समस्या कमी न होता वाढत गेली तर पुढच्या १० ते १५ वर्षांमध्ये ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ची म्हणजेच यकृत निकामी होण्याची वेळ येऊ शकते. यकृत निकामी झाल्यानंतर उपचारांचे मार्ग खुंटतात. यकृत प्रत्यारोपणासह मोजकेच मार्ग शिल्लक राहतात आणि आज तरी फार कमी जणांना यकृत प्रत्यारोपण व तत्सम उपचार शक्य होतात, असे यकृत व पोटविकारतज्ज्ञ डॉ. जय तोष्णीवाल यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

    निर्बंध, नियमावली हवीच

    अलीकडे लहान वयापासूनच गोड पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चॉकलेटस्, जंक फुड खाण्याच्या प्रमाणाचा अतिरेक होताना दिसत आहे. अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबातही वाढदिवस गोडधोड पदार्थांनी साजरा होताना दिसतो. हेच प्रमाण नंतर आणखी वाढत जाताना सहज दिसून येते. पुन्हा याचे भान ना पालकांना असते ना इतर नातेवाईकांना. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्वच ‘सेलिब्रेशन’वर शाळांमधून निर्बंध हवेत. सार्वजनिक ठिकाणीदेखील अशा प्रकारच्या उत्सवांना काही नियमावली हवी आणि काही विशिष्ट वयापर्यंत मुलांना चुकीच्या खाद्यपदार्थांपासून दूर ठेवता येईल का, यावरही धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही मत डॉ. तोष्णीवाल यांनी नोंदवले.
    पत्नीचा मृत्यू, पदरी दीड वर्षाचं बाळ; काळजावर दगड ठेवत पतीचा मोठा निर्णय, मृत्यूनंतरही ती ‘जिवंत’
    ‘एनएएफएलडी’चा धोका खूप जास्त आहे आणि त्याचा फटका पुढील पिढ्यांना बसू शकतो, हे लक्षात घेऊन आताच पावले टाकणे गरजेचे आहे. मूळच्या भारतीय आहाराकडे वळणे, स्क्रीन टाईम कमी करुन खेळणे, व्यायाम करणे, अशा बाबींना अधिकाधिक प्रमाणात आचरणात आणले तरच ‘सिऱ्हॉसिस’च्या त्सुनामीपासून वाचता येईल.-डॉ. अनिरुद्ध गोपनपल्लीकर, यकृत व पोटविकारतज्ज्ञ

    आज ज्या गतीने ‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढताना दिसत आहे, त्यानुसार येत्या दशकात भारत हा मधुमेह, स्थुलत्वाप्रमाणेच ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ची राजधानी होईल, अशी नक्कीच भीती आहे. अनेक पातळ्यांवर सुधारणा झाल्या नाही तर ही समस्या अटळ आहे.-डॉ. जय तोष्णीवाल, यकृत व पोटविकारतज्ज्ञ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed