• Fri. Nov 15th, 2024

    राज्यात सॅटेलाईट कँपसची स्थापना केल्याने स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    Jul 29, 2023
    राज्यात सॅटेलाईट कँपसची स्थापना केल्याने स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि.२९: महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. राज्यात अनेक ठिकाणी सॅटेलाईट कँपसची स्थापना केल्याने युवकांचा मोठ्या शहरांकडे येण्याचा ओढा कमी होईल आणि त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

    मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजास आज दिनांक २९ जुलै, २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यासाठी विविध अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्याची निवड प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होत आहे. विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. विद्यापीठामार्फत १८ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची निर्मिती अगदी अल्प कालावधीत केली असून उद्योग जगताशी त्यांची सांगड घालण्यात आली आहे. विद्यापीठातील सगळे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन असून यात श्रेणी, कौशल्‍याधारित कोर्सेस, ऑन जॉब ट्रेनिंग याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ४० टक्के अभ्यासक्रम वर्गात व ६० टक्के अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंगच्या स्वरुपात शिकविण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    विद्यापीठाने अकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडीटसला नोंदणी केली असून प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने पहिल्या वर्षापासून तंत्र विज्ञानाला जोड देऊन डिजिटल विद्यापीठ करण्याचा मानस आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने स्वतःची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएल) सुरु केली आहे. त्याचबरोबर क्लाऊड लॅबस् आणि डाटा सेंटरची सुद्धा स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, विद्यापीठ नवीन शैक्षणिक धोरण अनुसरुन पुढील वाटचाल करीत आहे. विद्यापीठामार्फत विविध २० कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपकेंद्र मुंबई, नवी मुंबई, पुणे, लोणावळा व औरंगाबाद येथे चालू करण्यात येणार आहेत तसेच, नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे, मुलुंड येथे पुढच्या शैक्षणिक वर्षात उपकेंद्र सुरु करण्याचा मानस आहे. विद्यापीठाचे मुख्य संकुल हे पनवेल येथे प्रस्तावित आहे. विद्यापीठाचे यावर्षीचे अभ्यासक्रम नवी मुंबई, खारघर येथे व पुणे, औंध येथे सुरु करण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून अपस्किलींग आणि फिनिशर्स प्लॅटफॉर्मची संकल्पना राबविली जात असल्याची  माहिती कुलगुरु डॉ. पालकर यांनी दिली.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed