• Fri. Nov 15th, 2024
    औरंगजेबाच्या कबरीवर गेलो, हिंदू मुस्लीम दंगली थांबवण्यासाठीच मी तसे केले, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

    Prakash Ambedkar Statement on Aurangjeb Kabr: हिंदू मुस्लीम मुद्दा पुन्हा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अकोला : निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसंतसं प्रचारात रंगत चढत आहे. यातच राजकीय नेत्यांकडून मोठी विधाने केली जात आहेत. हिंदू मुस्लीम मुद्दा पुन्हा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘आपण औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्याच्या कृतीमुळे राज्यातील दंगली थांबल्या, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

    अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे अकोला पूर्व आणि मुर्तीजापुर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकरांनी प्रमुख उपस्थिती लावली. याआधी प्रकाश आंबेडकरांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यानंतर राजकीय वादंग उफाळला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी तो मुद्दा पुन्हा गिरवल्याने याचे कोणते राजकीय पडसाद उमटतात हे पाहावे लागणार आहे.

    काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

    गेल्या वर्षीच जून महिन्यात खुल्ताबाद मध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली. त्याच मुद्द्याचा आता पुन्हा उल्लेख करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, आधी जो चुकीचा समज तयार करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला, तो थांबवण्यासाठीच मी हे कृत्य केले होते. माझ्या या प्रयत्नांना यश आले आहे, असे मी समजतो. औरंगजेबाच्या नावाने ज्या दंगली होत आहेत त्या आता होणार नाहीत, असा निर्वाळाही आंबेडकरांनी दिला.

    यासोबतच प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समाजालाही आवाहन केले की, ‘नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत संविधान डोक्यावर घेतात, बायबल आहे असे सांगतात. मी मुस्लिम समाजाला आवाहन करतो, मागच्या पाच वर्षात खूप हल्ले झाले आहेत. त्यावेळी, वंचित बहुजन आघाडीच आपल्या पाठीमागे उभी राहिली. बाकी कोणी आले नाहीत. राज्यातील विधानसभा मतदारसंघात ३२ जागा अशा आहेत. जिथे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत होत आहे. तेथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट बाबरी मस्जिद विद्ध्वंसासाठी कारणीभूत आहेत. जर या मुद्द्यावर मुस्लिमांकडून मत मागणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी शंभरदा करेन असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनेचे दोन्ही गट तुमच्या बाजूने नाहीत, त्यामुळे मौलवींना माझं आवाहन आहे, आमच्या बाजूने या.’

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed